![]()
भाजपने इंधन दरवाढीवरून विरोधकांकडून होणारी टीका जोरकसपणे फेटाळून लावली आहे. इंधन दरवाढ ही कुणालाही आवडत नाही. जागतिक परिस्थिती, क्रूड ऑईलचे वाढते दर, युद्धजन्य तणाव व आर्थिक अस्थिरता यामुळे काही निर्णय अपरिहार्य ठरतात. त्यामुळे विरोधकांकडून यासंबंधी होणारी टीका ही साप-साप म्हणत भुई थोपटण्याचा प्रकार आहे, असे भाजपने म्हटले आहे. पश्चिम आशियातील तणावामुळे इंधनदराचा भडका उडाला आहे. केंद्र सरकारने शनिवारी पेट्रोलच्या दरात लिटरमागे 87 पैसे, तर डिझेलच्या दरात 91 पैशांची वाढ केली. यामुळे गेल्या 9 दिवसांत पेट्रोल-डिझेलचे दर 5 रुपयांनी वाढले आहेत. सीएनजीच्या दरातही 1 रुपया प्रतिकिलो अशी वाढ करण्यात आली आहे. या दरवाढीमुळे विरोधी पक्षांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र भाजपचे उपाध्यक्ष केशव उपाध्ये यांनी विरोधकांवर उपरोक्त शब्दांत निशाणा साधला आहे. विरोधकांचा जनतेचे कैवारी बनल्याचा आव केशव उपाध्ये म्हणाले, विरोधकांची नौटंकी… “साप साप” करत भुई थोपटण्याचा प्रकार! इंधन दरवाढ ही कुणालाही आवडणारी गोष्ट नाही. पण जागतिक परिस्थिती, क्रूड ऑईलचे वाढते दर, युद्धजन्य तणाव आणि आर्थिक अस्थिरता यामुळे काही निर्णय अपरिहार्य ठरतात. तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील ‘एनडीए’ सरकारने जगातील अनेक देशांच्या तुलनेत कमी दरवाढ ठेवत जनतेला शक्य तितका दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, या निमित्ताने विरोधकांची सुरू झालेली नौटंकी म्हणजे “साप साप” करत भुई थोपटण्याचा प्रकारच म्हणावा लागेल! ‘यूपीए’च्या काळात इंधन दरवाढ म्हणजे विकासाचा भाग मानणारे लोक आज अचानक जनतेचे कैवारी बनल्याचा आव आणत आहेत. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या काळात 2004 ते 2014 दरम्यान पेट्रोलच्या दरात तब्बल 111 टक्के वाढ झाली, डिझेल 160 टक्क्यांहून अधिक वाढले आणि घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतींनी 284 टक्क्यांची उसळी घेतली होती. त्या वेळी हेच आंदोलनवीर कुठे होते? कॅमेऱ्यासमोर रडगाणं गाणारे आणि स्क्रिप्ट वाचणारे चेहरे तेव्हा गप्प का होते? मगरीचे अश्रू ढाळण्याचा प्रयत्न केशव उपाध्ये पुढे म्हणाले, आज मात्र महागाईवर मगरीचे अश्रू ढाळत जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण जनतेची स्मरणशक्ती कमी नाही. कोणाच्या काळात महागाईने कंबरडे मोडले आणि कोणाच्या नेतृत्वात जागतिक संकटातही अर्थव्यवस्था सक्षमपणे उभी राहिली, हे देशाने पाहिले आहे. मोदी सरकारने अनेक वेळा इंधनावरील करकपात करून दिलासा दिला. उज्ज्वला योजनेतून लाखो गरीब घरांमध्ये गॅस पोहोचवला, चूल पेटती ठेवली. जागतिक संकटांच्या काळातही अर्थव्यवस्था स्थिर ठेवण्याचे काम केले. पण विरोधकांची भूमिका कायम दुटप्पीच – स्वतःच्या काळातील भरमसाठ दरवाढ विसरायची आणि आज खोटा आक्रोश करायचा! शेवटी आकडे खोटं बोलत नाहीत… सत्य जनतेसमोर स्पष्ट उभं आहे. अनेक संकटांत आदरणीय नरेंद्रजी मोदी यांनी देशाला सक्षमपणे पुढे नेलं आहे आणि सध्याच्या आव्हानांतूनही देश अधिक ताकदीने बाहेर पडेल, यावर जनतेचा विश्वास आहे. विरोधकांचं नक्राश्रू ढाळणं सुरू राहू दे… जनताच त्यांना वेळोवेळी आरसा दाखवत राहील, असे ते म्हणालेत.
Source link