Headlines

नागपूर परिक्षेत्रात महसूल विभाग लाचखोरीत अव्वल:19 सापळ्यांसह अव्वल, पोलिस विभाग 12 कारवायांसह दुसऱ्या स्थानी




नागपूर परिक्षेत्रात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) केलेल्या कारवाईत महसूल विभाग लाचखोरीत अव्वल ठरला आहे. जानेवारी २०२५ ते जून २०२६ या कालावधीत एसीबीने केलेल्या मोठ्या कारवायांमध्ये महसूल विभागावर तब्बल १९ यशस्वी सापळे रचण्यात आले आहेत. या लाचखोरीच्या यादीत पोलीस विभाग १२ कारवायांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. एसीबीने मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता, तहसीलदार आणि पोलीस उपनिरीक्षकांसारख्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर थेट सापळे रचून ही कडक कारवाई केली आहे. आरटीओ चेकपोस्टवरील कारवाईदरम्यान अनेकदा मुख्य अधिकारी स्वतः लाच न घेता वसुलीसाठी खाजगी एजंट (दलाल) नेमतात. शासकीय जागेत केवळ शासकीय कर्मचाऱ्यांनीच दंडात्मक कारवाई करणे अपेक्षित असताना, खाजगी एजंट नेमून पैशांची बेकायदेशीर वसुली करणे हा गुन्हा ठरतो. त्यामुळे प्रत्यक्ष लाचेचे पैसे स्वीकारताना अधिकारी हजर नसला तरी, बेकायदेशीर वसुलीला प्रोत्साहन दिल्याबद्दल संबंधित प्रभारी मोटार वाहन निरीक्षकांवर ‘भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८’ च्या कलम १२ (अपप्रेरणा) अन्वये गुन्हा दाखल केला जात आहे. नागपूर परिक्षेत्रातील या धडक मोहिमेत महसूल आणि पोलीसनंतर आरोग्य विभागात ६ कारवाया झाल्या आहेत, तर वन विभाग, ग्रामविकास आणि वीज मंडळात प्रत्येकी ५ कारवाया करण्यात आल्या आहेत. भ्रष्टाचाराच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या आरटीओ विभागात एकूण ८ यशस्वी सापळे रचण्यात आले असून, त्यात ३ एआरटीओ, ४ एमव्हीआय, १ लिपिक आणि ८ खाजगी इसम अशा एकूण १७ लोकांवर गुन्हे दाखल झाले आहेत. याशिवाय शिक्षण व कृषी विभागात प्रत्येकी ४, जिल्हा परिषदेत ३, आणि पंचायत समिती, महानगरपालिका, भूमी अभिलेख, मुद्रांक नोंदणी तसेच जलसंपदा विभागात प्रत्येकी २ यशस्वी सापळे रचण्यात आले आहेत. कोणत्याही शासकीय कामासाठी कायदेशीर शुल्काव्यतिरिक्त लाचेची मागणी होत असल्यास नागरिकांनी तातडीने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नागपूर कार्यालयाशी संपर्क साधावा. नागरिकांचा विश्वास वाढवण्यासाठी विभागाने जाहीर केले आहे की, सापळा कारवाईत वापरण्यात आलेली तक्रारदाराची रक्कम एका महिन्याच्या आत परत केली जाईल आणि संबंधित शासकीय विभागात अडकलेले त्यांचे वैध कामही पूर्ण करून दिले जाईल. लाचेच्या तक्रारीसाठी नागरिकांनी १०६४ या टोल फ्री क्रमांकावर किंवा ९०६७६७१०६४ या व्हॉट्सॲप क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस अधीक्षक डॉ. दिगंबर प्रधान यांनी केले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *