Headlines

मोदी जनतेला 'स्लो पॉईजन' देत आहेत:इंधन दरवाढीवर विरोधकांचा घणाघात; देश ठप्प, पण सरकार मेलोडी खाऊन गप्प बसल्याचा आरोप




आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाल्यामुळे केंद्राने सोमवारी पुन्हा एकदा पेट्रोल व डिझेलच्या किंमतीत अनुक्रमे 2.72 व 2.81 रुपयांची वाढ केली. गत 10 दिवसांतील ही चौथी दरवाढ आहे. त्यामुळे महागाईच्या आगीत होरपळणाऱ्या सर्वसामान्यांना जबर झटका बसला आहे. विरोधकांनी या प्रकरणी सरकारवर टीकेची झोड उठवत पंतप्रधान नरेंद्र मोदी या दरवाढीच्या माध्यमातून जनतेला स्लो पॉईजन देत आहेत, असे ते म्हणालेत. पेट्रोल आणि डिझेल आजपासून अनुक्रमे प्रति लीटर 2.72 व 2.81 रुपयांनी महाग झाले आहे. नवे दर आज 25 मे पासून तात्काळ लागू झाले आहेत. मागील 10 दिवसांत करण्यात आलेली ही चौथी दरवाढ आहे. त्यामुळे विरोधकांनी सरकारवर चांगलेच तोंडसूख घेतले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी या दरवाढीवरून सरकारवर जोरदार हल्ला चढवला. या प्रकरणी त्यांनी दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, अटलबिहारी वाजपेयी व डॉक्टर मनमोहन सिंग यांची आठवण काढली. जागतिक प्रश्नांत हस्तक्षेप करू शकणारे उत्तुंग नेतृत्व नसल्याचा फटका सध्या देशाला सहन करावा लागत असल्याचे ते म्हणाले. सरकार मेलोडी चॉकलेट खाऊन गप्प रोहित पवार म्हणाले, आज पंडीत नेहरु किंवा स्व. इंदिरा गांधी किंवा अटलबिहारी वाजपेयी किंवा डॉ. मनमोहनसिंग यांच्यासारखं जागतिक प्रश्नात हस्तक्षेप करु शकणारं उत्तुंग नेतृत्त्व नसण्याचा जबर फटका देशाला सहन करावा लागतोय. आज पेट्रोल-डिझेलच्या दरात लिटरमागे अडीच रुपये वाढ झाली असून रोजच होणारी ही दरवाढ म्हणजे सरकारचं अर्थव्यवस्थेवरील नियंत्रण पूर्णपणे सुटल्याचं लक्षण आहे. या दरवाढीमुळं देश ठप्प होत असताना सरकार मात्र मेलोडी चॉकलेट खाऊन गप्प बसलंय. यावर उपाययोजना करण्यास सरकार पूर्णतः असमर्थ ठरत असल्याने हा देश वाचावा यासाठी आपण एकतर केवळ प्रार्थना करु शकतो किंवा व्यवस्थेच्या विरोधात रस्त्यावर उतरुन सरकारला जाब विचारु शकतो. चॉईस जनतेचा आहे.
गिरीश महाजनांचा घेतला समाचार रोहित पवार यांनी यावेळी ‘रांगेत उभे राहणारे काळा बाजार करणारे’ असल्याचा दावा करणाऱ्या मंत्री गिरीश महाजन यांच्याही विधानाचा समाचार घेतला. ते म्हणाले, ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर डिझेल नसल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडला असताना ‘रांगेत उभे राहणारे काळा बाजार करणारे आहेत,’ हे मंत्री गिरीश महाजन यांचं वक्तव्य अत्यंत संतापजनक आणि असंवेदनशील आहे. रांगेत उभे राहणारे गोरगरीब शेतकरी आहेत, काळाबाजार करायला ते काही सत्तेतील मंत्री नाहीत. महाकुंभमेळ्याच्या कामात निविदा वाढवून रिंग करून किती काळाबाजार केला हे जगजाहीर आहे. कुंभमेळ्याच्या कामांमध्ये केलेल्या काळ्या बाजाराबाबत लवकरच पुराव्यासकट बोलणार आहे..!

मोदीजी देशवासीयांना ‘स्लो पॉईजन’ देत आहेत शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी एकनाथ खडसे यांनीही या प्रकरणी सरकारवर निशाणा साधला. झोपलेले असाल तर जागे व्हा ! तुम्हाला आणखी एक झटका बसलाय. आज पेट्रोल डिझेलचे दर पुन्हा वाढले आहेत. पेट्रोल 2 रुपये 61 पैशांनी तर डिझेल 2 रुपये 71 पैशांनी. मागील 10 दिवसांत ही चौथी वाढ आहे. आम्ही आधीच सांगितले होते की निवडणुकीचा संपूर्ण खर्च भाजप सरकार हळूहळू वसूल करणार आहे. हा चौथा हफ्ता असून मोदीजी देशवासीयांना ‘स्लो पॉईजन’ देत आहेत, असे त्या म्हणाल्या.
दरवाढ शेतकऱ्यांवर मोठा आर्थिक आघात करणारी आमदार रोहित पाटील यांनीही या प्रकरणी सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले, दोन आठवड्यांत चौथ्यांदा इंधन दरवाढ झाली आहे. शेतीच्या मशागतीचा हंगाम सुरू असताना डिझेल-पेट्रोलचे वाढते दर शेतकऱ्यांसाठी मोठा आर्थिक आघात ठरत आहेत. इंधन दरवाढीमुळे महागाई आणखी वाढण्याची शक्यता आहे. भाजीपाला, धान्य, दूध, वाहतूक आणि जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढण्याचा फटका सामान्य कुटुंबांना बसणार आहे. अशा संवेदनशील काळात सरकारने जनतेला दिलासा देण्याऐवजी वारंवार दरवाढ करून आर्थिक संकट अधिक गंभीर होत आहे.
हे ही वाचा… परभणीच्या मानवत येथे डिझेलसाठी हाणामारी:’हेच का भाजपचे अच्छे दिन’ म्हणत काँग्रेसची सरकारवर टीका; VIDEO व्हायरल राज्यातील बहुतांश भागात पेट्रोल – डिझेलच्या टंचाईने स्थिती बिकट बनली आहे. आता परभणीच्या मानवत येथे डिझेलसाठी नागरिकांत चक्क हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला असून, त्यावर राजकीय वर्तुळातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. वाचा सविस्तर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *