Headlines

मुंबई, पुणे, ठाण्यात सोसायट्यांतील ‘कुर्बानी’ला नागरिकांचा विराेध:निषेधानंतर पोलिस-प्रशासनाकडून उघड्यावर कत्तलीस मनाई




बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह ठाण्यातील मीरा रोड आणि पुण्यातील गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये कुर्बानीवरून तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरी वस्त्यांमध्ये आणि सोसायटीच्या आवारात कुर्बानी देण्यास रहिवाशांनी विरोध दर्शवल्याने प्रशासकीय पेच वाढला आहे. या वादानंतर मुंबईत १३ हजारांहून अधिक पोलिसांचा फौजफाटा तैनात केला आहे. उघड्यावर कुर्बानी देण्यास प्रशासनाने सक्त मनाई केली. मुंबईतील घाटकोपर आणि गोरेगाव येथील काही सोसायट्यांमध्ये कुर्बानीच्या ठिकाणावरून रहिवाशांमध्ये मतभेद झाले. यामुळे मुंबईत ८ अपर पोलिस आयुक्त, २१ उपायुक्त, ६१ सहायक आयुक्तांसह १० हजार ९१० अंमलदार आणि १९८० अधिकारी असा पोलिसांचा कडेकोट पहारा ठेवण्यात आला आहे. संवेदनशील भागात एसआरपीएफ आणि दंगल नियंत्रण पथके तैनात आहेत. ठाण्यात मीरा रोड येथील सृष्टी कॉम्प्लेक्समध्ये बकरे आणण्यावरून दोन गटांत मोठा वाद झाला. हिंदू संघटना आणि स्थानिक रहिवाशांनी याला तीव्र विरोध करत हनुमान चालिसा पठण आणि घोषणाबाजी केली. त्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करत ५१ बकरे सुरक्षित स्थळी हलवले. दुसरीकडे, पुण्यातही सार्वजनिक ठिकाणी होणारे अनधिकृत पशुबळी रोखण्यासाठी राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी पुणे पोलिस प्रशासनाला तातडीने कारवाईची मागणी पत्राद्वारे केली आहे. निवासी भागात कुर्बानी नियमबाह्यच सोसायटीच्या आवारात कुर्बानी देण्यावरून गृहनिर्माण संस्थांचे अंतर्गत नियम आणि धार्मिक प्रथा यात मोठा पेच निर्माण झाला आहे. सागर पार्क आणि गोकुळधामसारख्या वसाहतींमध्ये हा वाद अधिक गडद झाला. प्रशासनाच्या स्पष्ट निर्देशानुसार, केवळ अधिकृत कत्तलखाने किंवा पालिकेने निश्चित केलेल्या पर्यायी ठिकाणीच कुर्बानी देणे अनिवार्य आहे. तरीही निवासी भागात विनापरवानगी बकरे आणल्याने नागरिकांमधील संघर्ष वाढला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *