![]()
कळमनुरी येथील नवनाथ बेद्रे खून प्रकरणातील फरार असलेल्या दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तब्बल पाच तासाच्या नाकाबंदी नंतर गुरुवारी ता. २८ पहाटे पाच वाजता हिंगोली ते वाशीम मार्गावर तोंडगाव शिवारातून एका खाजगी वाहनातून पकडले. त्यांच्याकडून आता खूनाचे नेमके कारण स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. कळमनुरी येथील नवनाथ बेद्रे या तरुणाचा शुक्रवारी ता. २२ रात्रीच्या सुमारास खून झाला होता. आरोपींना नवनाथ याच्या डोक्यात दगडाने वार करून खून केला. या प्रकरणी कळमनुरी पोलिस ठाण्यात सहा जणांवर गुन्हा दाखल झाला होता. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने पथके स्थापन करून चौघांना अटक केली होती. मात्र दोघे जण फरार झाले होते. दरम्यान, या प्रकरणात फरार असलेल्या आकाश सातव, भरत यादव (रा. कळमनुरी) यांचा शोध सुरु करण्यात आला होता. त्यासाठी पोलिस अधिक्षक निलाभ रोहन, अप्पर पोलिस अधिक्षक कमलेश मिना, गुन्हे शाखेचे निरीक्षक मोहन भोसले यांनी गुन्हे शाखेचे विशेष पथक स्थापन केले होते. या पथकामध्ये गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे, उपनिरीक्षक माधव जिव्हारे, जमादार गजानन पोकळे, सतीष जाधव, शिवाजी जालमिरे, हरिभाऊ गुंजकर यांच्या पथकाने आरोपींची माहिती घेण्यास सुरवात केली. दरम्यान, दोघेही राजस्थान भागात पळाल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी राजस्थानला जाण्याची तयारी सुरु केली होती. मात्र बुधवारी ता. २७ ते दोघे वाशीमकडे येणार असल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली होती. त्यावरून पोलिसांच्या पथकाने बुधवारी मध्यरात्री बारा वाजल्या पासून हिंगोली ते वाशीम मार्गावर थांबून वाहनांची तपासणी सुरु केली होती. पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास आकाश व भरत एका खाजगी वाहनातून जात असतांना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यांना पुढील चौकशीसाठी कळमनुरी पोलिसांच्या हवाली करण्यात आली आहे.
Source link
कळमनुरी येथील खून प्रकरण:5 तासांच्या नाकाबंदी नंतर फरार आरोपी ताब्यात, तोंडगाव मार्गावर पहाटे 5 वाजता खाजगी वाहनातून पकडले