Headlines

210 साखर कारखान्यांकडून 1036 लाख टन ऊसाचे गाळप:'विस्मा'ची साखर-जैवऊर्जा परिषद पुण्यात, उत्कृष्ट कारखान्यांचा सन्मान




वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (विस्मा) यांच्यावतीने शनिवारी (३० मे) पुणे येथे साखर आणि जैव ऊर्जा (बायोएनर्जी) या विषयावर एका परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेत विशेष उल्लेखनीय काम केलेल्या साखर कारखान्यांना पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे, केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते या परिषदेचे उद्घाटन होईल. केंद्रीय साखर सहसचिव अश्विनी श्रीवास्तव आणि राज्याचे साखर आयुक्त डॉ. संजय कोलते हे देखील परिषदेत सहभागी होणार आहेत. ही माहिती विस्माचे महासचिव पांडुरंग राऊत, खजिनदार महेश देशमुख, संचालक रोहित नरा आणि कार्यकारी संचालक अजित चौगुले यांनी पत्रकार परिषदेत दिली. या परिषदेमध्ये साखरेबरोबरच ऊसापासून तयार होणाऱ्या सहपदार्थांची निर्मिती, ग्रीन हायड्रोजनची आवश्यकता, हवाई इंधनावरील संशोधन, कचऱ्यामधून जैव इंधन निर्मिती आणि कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा साखर कारखान्यांमधील उपयोग अशा विविध विषयांवर तज्ञांचे मार्गदर्शनपर चर्चासत्र होणार आहे, असे राऊत यांनी सांगितले. यंदाच्या साखर हंगामात राज्यातील एकूण २१० साखर कारखान्यांनी सुमारे १०३६ लाख टन ऊसाचे गाळप केले आहे. यामध्ये १०७ खाजगी आणि १०३ सहकारी कारखान्यांचा समावेश आहे. या गाळपातून ९८ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. राज्यातील सुमारे ५५ टक्के साखर उत्पादन खाजगी कारखान्यांकडून होते. दरम्यान, केंद्र शासनाकडे साखर निर्यातबंदी उठवण्यासंबंधी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्याशी शिष्टमंडळासह चर्चा केली आहे. यावर लवकरच सकारात्मक निर्णय अपेक्षित असल्याचे विस्माच्या पदाधिकाऱ्यांनी नमूद केले. विस्माच्या कार्यक्षेत्रात महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा येथील सुमारे १३९ खाजगी साखर कारखाने सदस्य आहेत. यापैकी उत्कृष्ट काम करणाऱ्या साखर कारखान्यांना आणि त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्यांच्या कामगिरीनुसार परिषदेत विशेष पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. यामध्ये दालमिया भारत शुगर (कोल्हापूर), जागृती शुगर (लातूर), नॅचरल शुगर (धाराशिव), श्रीनाथ म्हस्कोबा कारखाना (दौंड, पुणे), श्री गुरुदत्त शुगर (कोल्हापूर) आणि दौंड शुगर (पुणे) या कारखान्यांचा समावेश आहे. वरिष्ठ अधिकारी श्रेणीमध्ये शहाजी गायकवाड (दौंड शुगर), संतोष कुंभार (दालमिया भारत शुगर), तुषार निघुते (वेंकटेश्वरा शुगर), वसंत शिंदे (केजीएस शुगर), बी. जी. चव्हाणके (जयवंत शुगर), शशिकांत निगुत (नॅचरल शुगर) आणि शिवाजी शिंदे (सिध्दी शुगर) यांना सन्मानित केले जाईल.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *