![]()
राजकारणात पद, सत्ता आणि स्वार्थासाठी निष्ठा बदलण्याच्या घटना नेहमी चर्चेत असतात. मात्र नांदेड जिल्ह्यातील एका शिवसैनिकाची कहाणी सध्या राज्यभर चर्चेचा विषय ठरली आहे. पक्षासाठी आणि निवडणुकीसाठी स्वतःची 22 गुंठे शेतजमीन विकूनही पक्षाची साथ न सोडणाऱ्या कार्यकर्त्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मोठा दिलासा दिला आहे. या दोघांनी पुढाकार घेत संबंधित कार्यकर्त्याची विकलेली जमीन पुन्हा त्याच्या नावावर करून दिल्याने हा प्रसंग राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला आहे. ही घटना नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यातील शिवसेना तालुकाप्रमुख माधव जाधव वडगावकर यांच्याशी संबंधित आहे. अनेक वर्षांपासून पक्षासाठी काम करणाऱ्या माधव वडगावकर यांच्याकडे उपजीविकेचे साधन म्हणून अवघी 22 गुंठे शेतजमीन होती. नगर परिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक 2 मधून त्यांच्या पत्नी निवडणुकीच्या रिंगणात होत्या. निवडणुकीचा खर्च भागवण्यासाठी माधव वडगावकर यांनी आपली संपूर्ण जमीन विकली. मात्र निवडणुकीत त्यांच्या पत्नीचा पराभव झाला आणि त्यानंतर कुटुंबावर मोठे आर्थिक संकट कोसळले. पराभवामुळे राजकीय यश मिळाले नाहीच, उलट शेतीही हातातून गेल्याने वडगावकर कुटुंब अडचणीत सापडले. उपजीविकेचा आधार हरपल्यामुळे त्यांना अनेक आर्थिक समस्यांचा सामना करावा लागला. स्थानिक स्तरावर त्यांच्या परिस्थितीची चर्चा होत होती, मात्र त्यांना ठोस मदत मिळाली नव्हती. तरीही या संकटात त्यांनी पक्षाप्रती असलेली निष्ठा कायम ठेवली. पक्षाचे कार्यक्रम, बैठका आणि आंदोलने यामध्ये ते पूर्वीप्रमाणेच सक्रिय राहिले. सुमारे महिनाभरापूर्वी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे नांदेड दौऱ्यावर आले होते. त्यावेळी आयोजित आढावा बैठकीत एका स्थानिक पदाधिकाऱ्याने माधव वडगावकर यांच्या त्यागाची आणि त्यांच्या बिकट परिस्थितीची माहिती डॉ. श्रीकांत शिंदे यांना दिली. निवडणुकीसाठी जमीन विकूनही पक्षाशी निष्ठा कायम ठेवणाऱ्या कार्यकर्त्याची कथा ऐकून ते भावूक झाले. त्यांनी तत्काळ या प्रकरणाची दखल घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली. यानंतर शिंदे पिता-पुत्रांनी तातडीने मदतीचा निर्णय घेतला. आवश्यक आर्थिक भार स्वतः उचलत माधव वडगावकर यांनी विकलेली 22 गुंठे शेतजमीन पुन्हा त्यांच्या नावावर करून देण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. काही दिवसांपूर्वीपर्यंत शेती गमावून संकटात सापडलेल्या वडगावकर कुटुंबाला त्यामुळे मोठा दिलासा मिळाला. या निर्णयामुळे कार्यकर्त्यांमध्येही समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. साहेब, मी कायम तुमच्या ऋणात राहीन जमीन परत मिळाल्यानंतर माधव वडगावकर भावूक झाले. साहेब, मी कायम तुमच्या ऋणात राहीन, अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. या घटनेनंतर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सामाजिक माध्यमांवर प्रतिक्रिया देताना, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना ही केवळ राजकीय संघटना नसून आपल्या कार्यकर्त्यांसाठी कुटुंबाप्रमाणे उभी राहणारी ताकद आहे, असे म्हटले. एका सामान्य कार्यकर्त्याच्या निष्ठेची दखल घेत त्याला पुन्हा उभे करण्याचा हा प्रयत्न असल्याची चर्चा आता संपूर्ण राज्यात रंगली आहे.
Source link
एकनाथ शिंदे- श्रीकांत शिंदेंची संवेदनशीलता चर्चेत:हरवलेलं सर्वस्व परत मिळालं; जमीन परत मिळताच शिवसैनिकाच्या डोळ्यांत अश्रू