![]()
सोशल मीडियावरील ‘कॉकरोच जनता पार्टी’ या उपहासात्मक डिजिटल पक्षाच्या माध्यमातून ‘नीट’ परीक्षा गैरव्यवहार आणि पेपर लीकविरोधात दिल्लीत आंदोलन गाजवणारा अभिजीत दीपके रविवारी पहाटे छत्रपती संभाजीनगरात दाखल झाला. एक वर्षापासून भेट न झालेल्या आपल्या आई-वडिलांना भेटण्यासाठी तो वाळूज महानगरातील ‘महानगर एक’ मधील ग्रोथ सेंटर येथील घरी पोहोचला. यावेळी त्याच्या आई-वडिलांनी औक्षण करून त्याचे स्वागत केले. दरम्यान, त्याच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राज्य पोलिसांसह गुप्तचर यंत्रणा कमालीच्या ‘अलर्ट मोड’वर गेल्या आहेत.
अभिजीत दीपके याने शनिवारी (6 जून) समर्थकांसह दिल्लीच्या जंतरमंतर मैदानावर आंदोलन केले होते. सोशल मीडियावरील डिजिटल पक्षाचे हे आंदोलन प्रत्यक्ष मैदानावर जरी मोठ्या संख्येने गर्दी खेचू शकले नसले, तरी ‘नीट’ परीक्षा घोटाळ्याविरोधातील हा अनोखा निषेध देशभरात चांगलाच चर्चेत आला आहे.
दिल्लीत शनिवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत आंदोलनाची मुदत होती; मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे अभिजीतने दुपारी अडीच वाजताच आंदोलन थांबवले. सुरुवातीला त्याने मुंबईकडे रवाना होत असल्याचे जाहीर केले होते, परंतु सायंकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी त्याने सोशल मीडियावरून, आई-वडिलांना भेटण्यासाठी छत्रपती संभाजीनगरला जात आहे, असे स्पष्ट केले. त्यानुसार रात्री उशिरा तो शहरात दाखल झाला आणि पहाटे चारच्या सुमारास घरी पोहोचला. घराबाहेर 80 पोलिस कर्मचारी-10 अधिकारी तैनात अभिजीतच्या छत्रपती संभाजीनगर दौऱ्यामुळे पोलिस प्रशासन कमालीचे सतर्क झाले आहे. शनिवारी दिवसभर त्याच्या वाळूज येथील घराबाहेर पोलिस बंदोबस्त तैनात होताच, मात्र रात्रीतून या सुरक्षेत प्रचंड वाढ करण्यात आली. अभिजीतच्या घराबाहेर तब्बल 80 पोलिस अंमलदार आणि 10 पोलिस अधिकारी तैनात करण्यात आल्याने परिसराला छावणीचे स्वरूप आले आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी स्वतः या भागात प्रत्यक्ष भेट देऊन सुरक्षेचा आढावा घेतला. या आंदोलनाची देशभरात झालेली चर्चा आणि राजकीय संवेदनशीलता पाहता, कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलिस प्रशासनाने हा कडक बंदोबस्त ठेवल्याचे समजते.
Source link
'कॉकरोच जनता पार्टी'चा संस्थापक अभिजीत दीपके छत्रपती संभाजीनगरात:घराबाहेर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त, 80 पोलिस अन् 10 अधिकारी तैनात