![]()
पाणी फाउंडेशन, कृषी विभाग आणि उमेद यांच्या संयुक्त विद्यमाने भातकुली तालुक्यात आयोजित करण्यात आलेल्या फार्मर कप स्पर्धेत महिला शेतकरी गटांचा सहभाग दिसून येत आहे. स्पर्धेसाठी तालुक्यातील ७९ महिला व पुरुष शेतकरी गटांनी नोंदणी केली आहे. या स्पर्धेतून खा
.
भातकुली तालुक्यातून या स्पर्धेसाठी तब्बल ७९ महिला व पुरुष शेतकरी गटांनी नोंदणी केली आहे. सेंद्रिय शेतीला चालना देण्यासाठी आणि शेतीचा उत्पादन खर्च कमी करण्यासाठी तालुक्यात विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून नारीशक्ती गटाच्या निमंत्रक पौर्णिमा सवाई यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी एकत्र येत ३ जून रोजी हे नैसर्गिक कीटकनाशक तयार केले. हा अर्क तयार करण्यासाठी महिलांनी परिसरात सहज उपलब्ध होणाऱ्या १० वनस्पतींच्या पाल्यांचा वापर केला आहे. त्यामध्ये कडूनिंब, सीताफळ, धोत्रा, निरगुडी, रुई, पपई, रायमुनी, गुळवेल, लाल कन्हेर, करंज वनस्पतींचा समावेश होता. २ किलो हिरवी मिरची, १ किलो लसूण, ५ किलो गूळ, ५ लिटर गोमूत्र वापरले. हे सर्व साहित्य २०० लिटर पाण्यात मिसळून हे द्रावण ४० दिवस सावलीत ठेवले जाते. सध्या गटातील महिला सदस्य दररोज आळीपाळीने दिवसातून दोन वेळा हे मिश्रण ढवळण्याचे काम करत आहेत. ४० दिवसांनंतर हे द्रावण गाळून फवारणीसाठी योग्य होईल. दशपर्णी अर्क हे प्रभावी नैसर्गिक कीटक, बुरशीनाशक मानले जाते. पिकांवर कीड येण्यापूर्वीच याची फवारणी केल्यास प्रादुर्भाव रोखता येतो. यामुळे रासायनिक किटकनाशकांवर होणारा खर्च वाचणार असून, पर्यावरणपूरक शेतीला गती मिळणार आहे. महिलांच्या या उपक्रमातून प्रेरणा घेऊन घरातील मुलांनीही निंबोळ्या गोळा करण्यास सुरुवात केली आहे. या मोहिमेत शेतकऱ्यांना डिजिटल शेती शाळा, व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळत आहे. या तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकरी कमी खर्चात अधिक उत्पादनाच्या दिशेने पाऊल टाकत आहेत. या यशस्वी उपक्रमात पौर्णिमा सवाई, संगीता नाचनकर, जयश्री लाळे, कुसुम मेश्राम, पूजा शेंडे,छाया सवाई, अरुणा लाळे, पुष्पा जामठे, उज्वला पिंगळे, वृंदा मानकर,सुशीला मेश्राम या महिला शेतकऱ्यांनी सक्रिय सहभाग घेतला.
शेतकऱ्यांचे उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न ^शेतकऱ्यांनी समूहाने एकत्र येऊन शेतीचा खर्च कसा कमी करावा आणि अडचणींना सामोरे जात शेतात ‘एसओपी’ (प्रमाणित कार्यपद्धती) राबवून पिकाचे उत्पादन कसे वाढवावे, हाच पाणी फाउंडेशन फार्मर कपचा मुख्य उद्देश आहे. प्रशांत देवळे (पाणी फाउंडेशन टीम)