![]()
आरोग्यवारी अल्ट्राग्रुप रन-२०२६ मॅरेथॉन स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर २६ जुलै २०२६ रोजी पुणे-जेजुरी-बारामती मार्गावरील वाहतुकीत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. स्पर्धकांची सुरक्षितता आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी हे आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार, २६ जुलै रोजी सकाळी ४ ते दुपारी १२ या वेळेत पुणे बाजूकडून जेजुरीमार्गे सातारा, फलटण आणि बारामतीकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद राहील. या कालावधीत, पुणे बाजूकडून येणारी वाहतूक सासवड–नारायणपूर–कापूरहोळ, सासवड–वीर फाटा–परिंचे–लोणंद तसेच सासवड–पानवडी–मेमाणे–पिसर्वे–सुपा या पर्यायी मार्गांवरून वळवण्यात येणार आहे. जेजुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बेलसर फाटा, पारगाव मेमाणे चौक आणि कोथळे चौक येथेही वाहतुकीचे विशेष नियोजन करण्यात आले आहे. पुणे, बारामती, केडगाव चौफुला, सातारा आणि लोणंदकडे जाणाऱ्या वाहनांसाठी पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे, सुपा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पुणे–बारामती, बारामती–पुणे, केडगाव चौफुला–सातारा तसेच निरा–सुपा या मार्गांवरील वाहतूकही विविध पर्यायी मार्गांनी वळवण्यात येणार आहे. दरम्यान, बारामती शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सकाळी ७.०० ते सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत किंवा स्पर्धा संपेपर्यंत मॅरेथॉन मार्गावरील वाहतूक बंद राहील. स्पर्धेचा मार्ग विराट हॉटेल–खंडोबानगर–कारभारी सर्कल–गुणवडी चौक–इंदापूर चौक–भिगवण चौक–तीन हत्ती चौक असा आहे. बक्षीस वितरण समारंभ सायंकाळी ५.३० वाजता नटराज नाट्यमंदिर, बारामती येथे होणार आहे. या काळात भिगवण, पाटस, पुणे, मोरगाव आणि फलटणकडून येणाऱ्या वाहनांसाठी रिंगरोड, कोर्ट कॉर्नर, देशमुख चौक, रेल्वे पूल, एमआयडीसी मार्ग, मेडिकल कॉलेज मार्ग, कॅनॉल रोड तसेच इतर पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तीन हत्ती चौक ते सम्यक चौक हा मुख्य मार्ग दोन्ही बाजूंनी बंद राहणार असून, स्थानिक रहिवाशांसाठी सेवा रस्त्याची व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी नागरिकांना वाहतूक पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे पालन करून पर्यायी मार्गांचा वापर करावा आणि सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.
Source link
पुणे-जेजुरी-बारामती मार्गावर 26 जुलै रोजी वाहतुकीत बदल:आरोग्यवारी अल्ट्राग्रुप रन-2026 मॅरेथॉनसाठी जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश