![]()
अमरावती वन विभागातील वाघिणीच्या हल्ल्यात चार जणांचा जीव गेला आहे. या घटनेनंतर स्थानिक लोकप्रतिनिधींनी थेट मुंबईत वनमंत्री गणेश नाईक यांची भेट घेतली. राज्यात वाघ आणि बिबट्यांची संख्या वाढत असल्याने भविष्यात असे हल्ले टाळण्यासाठी वनमंत्र्यांनी काही सूचना दिल्या. त्यांनी केंद्रीकृत यंत्रणा तयार करण्याचे, अतिरिक्त पथके नेमण्याचे आणि स्वतंत्र टास्क फोर्स बनवण्याचे निर्देश दिले. वनमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. या बैठकीला आमदार संजय खोडके, आमदार उमेश यावलकर, आमदार रवी राणा, आमदार गजानन लवटे, आमदार प्रताप अडसड आणि विधान परिषदेचे सदस्य प्रवीण पोटे उपस्थित होते. वन विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर देखील या बैठकीत हजर होते. आमदार राजेश वानखडे, प्रवीण तायडे, केवलराम काळे, जिल्हाधिकारी आशिष येरेकर आणि मुख्य वनसंरक्षक जयोती बॅनर्जी हे अधिकारी ऑनलाइन सहभागी झाले होते. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. भविष्यात जीवितहानी टाळण्यासाठी वन विभागाला अधिक सक्षम करण्याची गरज या बैठकीत व्यक्त झाली. बिबट्या किंवा वाघाला पकडण्यासाठी लागणारे पिंजरे, पुरेसे मनुष्यबळ आणि इतर साधने तातडीने उपलब्ध करून द्यावीत. वन्यप्राण्यांचा बचाव आणि त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात. वन्यप्राण्यांच्या हालचालींची माहिती मिळताच पथकांनी लगेच घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणावी, असे निर्देश वनमंत्र्यांनी दिले. जीव गेल्यानंतर मदत करण्यापेक्षा अशा घटना टाळणे जास्त महत्त्वाचे आहे, असे ते म्हणाले. भविष्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी वन विभाग सर्व आवश्यक उपाययोजना करेल, अशी ग्वाही वनमंत्री गणेश नाईक यांनी दिली. वनमंत्र्यांनी सांगितले की, अतिरिक्त मनुष्यबळासह 24 तास काम करणारे ‘स्मार्ट स्क्वॉड’ तयार करावे. नागरिकांकडून किंवा सोशल मीडियावरून वन्यप्राण्यांच्या वावराची माहिती मिळताच वन विभागाने लगेच सतर्क होऊन घटनास्थळी पोहोचले पाहिजे. यासाठी एक केंद्रीकृत नियंत्रण कक्ष आणि तात्काळ माहिती पोहोचवणारी प्रभावी यंत्रणा उभारणे आवश्यक आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सूचना दिल्या की, बाधित परिसरात तातडीने पथक पाठवून परिस्थितीचा आढावा घ्यावा. इतर कामांपेक्षा वन्यप्राण्यांचा बचाव आणि नागरिकांची सुरक्षितता यांना जास्त महत्त्व द्यावे. कारवाई करताना नागरिकांच्या सुरक्षिततेची विशेष काळजी घ्यावी. त्यांच्यावर कोणताही हल्ला होणार नाही, यासाठी यंत्रणा पूर्णपणे सतर्क ठेवावी.
Source link
अमरावतीत वाघिणीच्या हल्ल्यात 4 जणांचा बळी:लोकप्रतिनिधी मुंबईत पोहोचले; वनमंत्र्यांनी दिले यंत्रणा सक्षम करण्याचे आदेश