Headlines

पोषण माहला लोकचळवळ बनवण्याचे सीईओंचे आवाहन:अमरावतीत नवव्या राष्ट्रीय पोषण माहचा शुभारंभ, अंगणवाडी सक्षमीकरणावर सीईओंचा भर




बालक, गर्भवती आणि स्तनदा मातांच्या पोषण तसेच आरोग्यविषयक गरजांबाबत जनजागृती करण्यासोबतच या अभियानाला लोकचळवळीचे स्वरूप द्या, असे आवाहन जिल्हा परिषदेचे सीईओ सत्यम गांधी यांनी केले. अमरावती येथे नवव्या राष्ट्रीय पोषण माहचा शुभारंभ त्यांच्या हस्ते करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या (डायट) सभागृहात हा कार्यक्रम झाला. यावेळी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विलास मरसाळे, डायटचे प्राचार्य मिलिंद कुबडे, अधिव्याख्याता प्रवीण राठोड, आहार तज्ञ वृषाली चव्हाण उपस्थित होते. तसेच बाल विकास प्रकल्प अधिकारी, विस्तार अधिकारी, पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका आणि डायटचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने हजर होते. गांधी यांनी सांगितले की, पोषण माह हा केवळ सरकारी कार्यक्रम न राहता, लोकसहभागातून उभी राहणारी चळवळ बनावा. यासाठी अंगणवाडी स्तरावर चांगले, नवीन आणि परिणामकारक उपक्रम राबवावे लागतील. पोषण आणि आरोग्य यांचा जवळचा संबंध असल्याने जनजागृतीद्वारे नागरिकांमध्ये पोषणाचे महत्त्व रुजवून लोकसहभाग वाढवणे आवश्यक आहे, यावर त्यांनी भर दिला. यावर्षीच्या राष्ट्रीय पोषण माहसाठी शासनाने पाच मुख्य विषय निश्चित केले आहेत. त्यात आहारातील विविधता आणि पुरेसे प्रथिने, अंगणवाडी केंद्रात ताजा व गरम शिजवलेला आहार, स्थानिक समुदायाची मालकी व जबाबदारी, बालकांच्या विकासासाठी पोषण व बाल्यकालीन उत्तेजन तसेच प्रधानमंत्री मातृ वंदन योजनेअंतर्गत माता आरोग्यासाठी रोख हस्तांतरण लाभ यांचा समावेश आहे. या पाचही विषयांवर आधारित विविध जनजागृतीपर कार्यक्रम जिल्ह्यात राबवले जातील. उद्घाटन कार्यक्रमावेळी विविध विषयांवरील माहितीचे स्टॉल लावण्यात आले होते. अंगणवाडी सेविकांनी घरपोच आहार तसेच स्थानिक अन्नघटकांचा वापर करून तयार केलेल्या विविध पौष्टिक पाककृतींचे प्रदर्शन मांडले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पर्यवेक्षिका आरती चिकटे यांनी केले, तर आभार बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) नवनाथ घणतोडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विस्तार अधिकारी दीपक ढवळे व सारंग काळे तसेच पर्यवेक्षिका सुचिता श्रीराव यांनी विशेष मेहनत घेतली. बाल विकास प्रकल्प अधिकारी, विस्तार अधिकारी, पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका तसेच जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले. स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेल्या अन्नघटकांचा पौष्टिक आहारामध्ये प्रभावी वापर कसा करता येतो, याचे प्रात्यक्षिक स्टॉलवर दाखवण्यात आले. मुख्य कार्यकारी अधिकारी गांधी यांनी या स्टॉलला भेट दिली. त्यांनी पाककृतींची पाहणी केली आणि आहाराची चव घेतली. यावेळी त्यांनी उपस्थित अंगणवाडी सेविकांशी आहाराची गुणवत्ता, पौष्टिकता आणि स्थानिक अन्नघटकांच्या वापराबाबत चर्चा केली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *