Headlines

भोकरदनमध्ये महिला बचत गटांच्या कर्जवसुलीविरोधात आंदोलन:2 वर्षांची स्थगिती, व्याजमाफीची मागणी




महिला बचत गटांच्या कर्जवसुलीसाठी मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून होणारा तगादा, वाढते व्याजदर आणि कर्जफेडीसाठी दिला जाणारा मानसिक त्रास याविरोधात भोकरदन येथे आंदोलन करण्यात आले. महिला बचत गटांच्या कर्जवसुलीला 2 वर्षांसाठी स्थगिती द्यावी, या कालावधीतील व्याज शासनाने भरावे तसेच महिलांना व्याजमाफी देण्यात यावी, अशी प्रमुख मागणी या आंदोलनातून करण्यात आली. कर्जफेडीला स्थगिती दिल्यानंतर संबंधित महिलांचा सिबिल स्कोअर खराब होऊ नये, याची जबाबदारीही शासनाने घ्यावी, अशी मागणी करण्यात आली. सामाजिक कार्यकर्ते केशव पाटील जंजाळ यांच्या नेतृत्वाखाली लोकजागर अभियान संघटनेच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी भोकरदन येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयामार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठविण्यात आले. या आंदोलनात परिसरातील 20 ते 25 गावांतील महिला बचत गटांच्या महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. हातात मागण्यांचे फलक घेऊन महिलांनी आपल्या अडचणी प्रशासनासमोर मांडल्या. कर्जवसुलीच्या तगाद्यामुळे महिलांवर आर्थिक आणि मानसिक ताण ग्रामीण भागातील अनेक महिलांनी कुटुंबाच्या आर्थिक गरजा भागविण्यासाठी तसेच लहान-मोठे व्यवसाय सुरू करण्यासाठी महिला बचत गटांच्या माध्यमातून कर्ज घेतले आहे. मात्र, आर्थिक परिस्थिती प्रतिकूल असल्याने अनेक महिलांना वेळेवर कर्जाचे हप्ते भरणे शक्य होत नाही. त्यातच मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून कर्जवसुलीसाठी वारंवार तगादा लावला जात असल्याने महिलांना आर्थिक अडचणींसोबत मानसिक त्रासालाही सामोरे जावे लागत असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. एका कर्जाचा हप्ता भरण्यासाठी दुसऱ्या ठिकाणाहून कर्ज घेण्याची वेळ अनेक महिलांवर येत आहे. त्यामुळे कर्जाचा बोजा दिवसेंदिवस वाढत असून, कुटुंबाच्या आर्थिक नियोजनावरही त्याचा परिणाम होत आहे. या परिस्थितीत महिलांना काही काळ दिलासा मिळणे आवश्यक असल्याची भूमिका केशव पाटील जंजाळ यांनी मांडली. 2 वर्षांची स्थगिती आणि व्याजमाफीची मागणी महिला बचत गटांनी घेतलेल्या कर्जाच्या वसुलीला किमान 12 ते 24 महिन्यांची स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. स्थगितीच्या काळात कर्जावर आकारले जाणारे व्याज शासनाने भरावे किंवा संबंधित महिलांना व्याजमाफी द्यावी, असेही निवेदनात म्हटले आहे. याशिवाय आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट असलेल्या पात्र कर्जदारांना कर्जमाफी देण्याबाबत शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली. केवळ कर्जवसुली स्थगित करून उपयोग होणार नाही, तर या कालावधीत संबंधित महिलांचा सिबिल स्कोअर खराब होणार नाही, याचीही काळजी घेणे गरजेचे आहे. अन्यथा भविष्यात महिलांना बँकांकडून किंवा इतर वित्तीय संस्थांकडून कर्ज मिळण्यात अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे सिबिल स्कोअर सुरक्षित ठेवण्याबाबत शासनाने स्पष्ट लेखी आदेश काढावेत, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. शासनाने बँका आणि फायनान्स कंपन्यांना स्पष्ट निर्देश द्यावेत कर्जवसुलीच्या नावाखाली महिलांना धमकावणे, मानसिक त्रास देणे किंवा सक्तीने हप्ते वसूल करणे असे प्रकार थांबविण्यासाठी शासनाने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी करण्यात आली. बँका आणि मायक्रो फायनान्स कंपन्यांना रिझर्व्ह बँकेच्या माध्यमातून आवश्यक निर्देश द्यावेत. तसेच राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांमार्फत संबंधित बँका आणि वित्तीय संस्थांना सक्तीची वसुली थांबविण्याबाबत सूचना द्याव्यात, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. अनेक महिला पदाधिकारी आणि नागरिकांची उपस्थिती या आंदोलनात रेखा जंजाळ, तुळसा संतोष गाडेकर, रानी पवार, अनिता कड, सुभाषराव पोटे, छगनराव पंडित, गजाननराव जी. कड, सचिन जी. तेलंग्रे, गणेश लोखंडे, दीपक लोखंडे, दादाराव जी. इंचे, अशोकराव इंचे, गजानन सोन्नी, दामोदर कोरडे, शालिकराम बोराडे, दिनकरराव जामुंदे, भगवान जाऊंदे, शेनफड भाऊ मालेगाव यांच्यासह परिसरातील नागरिक आणि महिला बचत गटांच्या सदस्यांची उपस्थिती होती. लोकजागर अभियानाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या या आंदोलनात महिलांच्या कर्जविषयक प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यात आले. महिला बचत गटांना आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी कर्जवसुलीला स्थगिती, व्याजमाफी आणि सिबिल स्कोअर सुरक्षित ठेवण्याबाबत शासनाने ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. आता या निवेदनाची शासनाकडून काय दखल घेतली जाते आणि कर्जदार महिलांना दिलासा मिळतो का, याकडे परिसरातील महिलांचे लक्ष लागले आहे. हेही वाचा… ‘अजितदादा असते तर घात करण्याची कुणाची हिंमत झाली असती का?’:सतीश चव्हाणांचा पराभवावरून महायुतीतील नेत्यांना सूचक इशारा विधानपरिषद निवडणुकीत मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर माजी आमदार सतीश चव्हाण यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधत आपली भूमिका स्पष्ट केली. या पराभवाला त्यांनी साधा राजकीय पराभव न मानता घात झाल्याचे म्हटले आहे. तसेच या निवडणुकीतील सर्वात मोठा टर्निंग पॉईंट म्हणजे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची अनुपस्थिती असल्याचे त्यांनी सांगितले. ‘अजितदादा असते तर घात करण्याची कुणाची हिंमत झाली असती का?’ असा सवाल करत त्यांनी अप्रत्यक्षपणे महायुतीतील काही नेत्यांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली. सविस्तर वाचा…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *