Headlines

खराडीत साडेचौदा वर्षांच्या मुलीचा बालविवाह:नऊ जणांविरुद्ध बालविवाह प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल




पुण्यातल्या खराडी परिसरात साडेचौदा वर्षांच्या अल्पवयीन मुलीचा विवाह केल्याप्रकरणी नऊ जणांविरुद्ध बालविवाह प्रतिबंधक अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गेल्या वर्षी घडली होती. या प्रकरणी एका अंगणवाडी सेविकेने खराडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अल्पवयीन मुलीचा विवाह झाल्याची माहिती जिल्हा बाल संरक्षण अधिकारी आणि जिल्हा महिला व बाल विकास अधिकाऱ्यांना पत्राद्वारे मिळाली होती. माहिती मिळाल्यानंतर चाईल्ड हेल्पलाईनचे स्वयंसेवक आणि संबंधित अधिकाऱ्यांनी चौकशी केली. या चौकशीत बालविवाहाचा प्रकार उघडकीस आला. मुलीचा विवाह एका तरुणाशी २८ मार्च रोजी झाला होता, असे समोर आले. अल्पवयीन मुलीचा विवाह करून दिल्याप्रकरणी संबंधित तरुणासह त्याची आई, भाऊ आणि काही नातेवाईकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर बालविवाह प्रतिबंध अधिनियम २००६ च्या कलम ९, १० आणि ११ अंतर्गत आरोप ठेवण्यात आले आहेत.या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक एस. चव्हाण करत आहेत. डंपरच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू भरधाव डंपरच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना मुंढव्यातील केशवननगर परिसरात नुकतीच घडली. या प्रकरणी डंपर चालकाविरुद्ध मुंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. सूरज रामेश्वर कोकाटे (वय २८) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वार तरुणाचे नाव आहे. याबाबत त्याचे वडील रामेश्वर (वय ५८, रा. जिंतूर, जि. परभणी) यांनी मुंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सूरज हा एका खासगी कंपनीत कामाला होता. दुचाकीस्वार सूरज हा केशवनगरमधील फ्लोरिडा इस्टेट सोसायटी परिसरातून निघाला होता. त्या वेळी भरधाव डंपरने दुचाकीस्वार सूरजला धडक दिली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या सूरज याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाला. अपघातानंतर पसार झालेल्या डंपर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस उपनिरीक्षक एन पाटील तपास करत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *