Headlines

अन्नदात्यासाठी अन्नत्याग!:सरसकट कर्जमाफीसाठी रोहित पवारांचे आजपासून पंढरपुरात बेमुदत आंदोलन




महायुती सरकारने जाहीर केलेल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीतील जाचक अटींच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार आजपासून पंढरप पवित्र भूमीत बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू करत आहेत. “सरकारने जाहीर केलेली ३५ हजार कोटींची कर्जमाफी म्हणजे शेतकऱ्यांच्या डोळ्यात धूळफेक आहे. यातील जाचक अटींमुळे लाखो शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार आहेत, असा गंभीर आरोप करत रोहित पवारांनी विनाअट सरसकट कर्जमाफीची मागणी लावून धरली आहे. विठ्ठला चरणी दर्शन घेऊन आंदोलनाला सुरुवात आमदार रोहित पवार आज सकाळी ९ वाजल्यापासून पंढरपूरमध्ये आंदोलन करणार आहेत. आंदोलनाचे नियोजन अत्यंत पद्धतशीरपणे करण्यात आले आहे. विशेष म्हणजे विठ्ठल भक्तांना आणि वारकऱ्यांना कोणताही त्रास होऊ नये, याची काळजी घेत रोहित पवार नामदेव पायरीवरून बाहेरूनच विठ्ठलाचे दर्शन घेणार आहेत. आंदोलन स्थळाचा आणि परिक्रमेचा मार्ग सुरुवात: श्री संत गाडगे बाबा मठ (स्टेशन रोड) येथून आंदोलनाला प्रारंभ होईल. तिथून राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक आणि छत्रपती शिवाजी महाराज स्मारक (चौक) मार्गे मार्गक्रमण केले जाईल. त्यानंतर चौफाळा – पश्चिम द्वार ते नामदेव पायरी येथे विठ्ठलाचे दर्शन घेतले जाईल. मंदिर परिक्रमानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकातून आंदोलक थेट ‘शिवतीर्थ’ (मुख्य आंदोलन स्थळ) येथे पोहोचतील आणि बेमुदत अन्नत्याग आंदोलनाला बसतील. प्रशासन मनाने आमच्याच सोबत! – रोहित पवार मार्ग अडवल्यानंतर रोहित पवारांनी ट्विट करत म्हटले की, “विठुरायाची पंढरी सर्व भक्तांसाठी कायम खुली असतानाही सरकार बॅरिकेड्स लावून आमच्या मार्गात अडथळे आणत आहे. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाने प्रत्येकाला आंदोलनाचा अधिकार दिलाय. त्यामुळे अन्नदात्यासाठीच्या या अन्नत्याग आंदोलनात कितीही अडथळे आणले तरी हे आंदोलन थांबणार नाही.” सरकारच्या हुकूमशाही वृत्तीवर तोफ डागत ते पुढे म्हणाले, “सत्तेचा अहंकार जनतेच्या ताकदीसमोर कधीही टिकत नसतो. लढणाऱ्यांचे हात धरून आणि बोलणाऱ्यांचे तोंड दाबून सरकार स्वतःचाच पराभव सिद्ध करतंय. सरकारच्या दबावामुळे जिल्हा आणि स्थानिक प्रशासनाकडून अडथळे आणले जात असले, तरी मनाने मात्र प्रशासनातील सर्वजण आमच्यासोबत आहेत, हे सरकारने विसरू नये. कर्जमाफीच्या जीआर (GR) वरून शेतकरी आक्रमक राज्य सरकारने नुकतीच शेतकऱ्यांसाठी ३५ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी जाहीर केलीय. परंतु त्यासोबत जोडलेल्या अनेक अटी व शर्तींमुळे राज्यातील शेतकरी संघटनांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. कालच (११ जून) मंचर येथे विविध शेतकरी संघटनांनी एकत्र येत सरकारच्या या कर्जमाफीच्या जीआरची होळी केली होती.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *