![]()
मोशी कचरा डेपो येथील दुर्घटनाग्रस्त इमारतीभोवतीचा मोठ्या प्रमाणावर असलेला मलबा हटवून इमारतीत प्रवेश मार्ग तयार करण्याचे काम वेगाने सुरू आहे. इमारतीत अडकलेल्या सुमारे ८ नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (NDRF) मार्गदर्शनाखाली बचावकार्य सुरू आहे. या कामाला गती देण्यासाठी अतिरिक्त यंत्रसामग्रीचा वापर केला जात आहे. सध्या इमारतीचा अस्थिर भाग स्थिर करण्याचे काम जलद गतीने सुरू आहे. इमारतीच्या बाजूचा मलबा हटवण्यासाठी जेसीबी, पोकलेन आणि डंपरचा वापर केला जात आहे. इमारतीत अडकलेल्या नागरिकांच्या जीविताची काळजी घेऊन ही मोहीम अत्यंत सावधगिरीने हाताळली जात आहे. घटनास्थळी प्रत्यक्ष पाहणी करून महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विजयकुमार चौबे आणि एनडीआरएफचे कमांडंट प्रवीण धट्ट यांनी आतापर्यंत झालेल्या कामाची माहिती घेतली. पुढील बचावकार्याच्या रणनीतीवर त्यांनी चर्चा केली. अडकलेल्या नागरिकांना सुखरूपपणे बाहेर काढण्यासाठी जागेवरील परिस्थिती आणि इमारतीची सद्यस्थिती याचा सर्वबाजूंनी विचार करून ही रणनीती ठरवण्यात आली आहे. आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले की, बचावकार्यासाठी आवश्यक सर्व साधनसामग्री आणि मशिनरी उपलब्ध असून त्या कार्यरत आहेत. घटनेला जवळपास ४५ तासांपेक्षा अधिक कालावधी झाला आहे. त्यामुळे जलद गतीने मोहीम राबवून इमारतीत अडकलेल्या नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्याचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी सर्व यंत्रणांना तसे निर्देश दिले आहेत. एनडीआरएफचे कमांडंट प्रवीण धट्ट यांनी माहिती दिली की, इमारतीच्या समोरील बाजूने प्रवेश मार्ग पूर्णपणे बंद झाला आहे. त्यामुळे मागील बाजूने इमारतीत प्रवेश करण्यासाठी त्या ठिकाणचा मलबा हटवून सुरक्षित मार्ग तयार करण्याचे काम वेगाने सुरू आहे. सुरक्षित बाहेर काढलेल्या नागरिकांकडून माहिती घेऊन आत अडकलेले नागरिक नेमके कोणत्या ठिकाणी आहेत, यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी मार्ग तयार करण्याचे नियोजन करून बचावकार्याला गती देण्यात आली आहे. दरम्यान, माजी खासदार प्रकाश आंबेडकर यांनीही दुर्घटनास्थळी भेट देऊन बचाव मोहिमेचा आढावा घेतला. त्यांनी महापौर रवि लांडगे आणि आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडून दुर्घटना आणि सुरू असलेल्या बचावकार्याची सविस्तर माहिती घेतली. आत अडकलेल्या नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना युद्धपातळीवर राबवाव्यात, असे त्यांनी सांगितले. तसेच, इमारतीत अडकलेल्यांच्या नातेवाईकांशी घटनास्थळी भेट घेऊन विचारपूस केली. यावेळी अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, विक्रांत बगाडे तसेच महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
Source link
मोशी कचरा डेपो दुर्घटना:इमारतीभोवतीचा मलबा हटवून सुरक्षित प्रवेश मार्ग तयार करण्याचे काम सुरू