Headlines

‘आरक्षण हटाव’वरून वडेट्टीवारांची भाजपवर टीकेची झोड:सुट्या तेलावरील बंदी आणि आदिवासी विद्यार्थ्यांच्या मुद्द्यांवरून सरकारला धरले धारेवर




‘आरक्षण हटाओ’च्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला. भाजपमध्येच काही नेते आरक्षण संपवण्याची भाषा करत असतील, तर केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी संबंधितांची नावे जाहीर करावीत, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली. आरक्षणाच्या मुद्द्यावर भाजपची नेमकी भूमिका काय आहे, हे स्पष्ट करण्याचे आव्हानही त्यांनी दिले. नागपूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत वडेट्टीवार यांनी आरक्षण, आदिवासी विद्यार्थ्यांच्या समस्या, तुकाराम मुंढे यांच्याशी संबंधित निर्णय, राहुल गांधींचा नागपूर दौरा आणि राज्यातील विविध राजकीय मुद्द्यांवर सरकारवर टीका केली. आरक्षण संपवण्याची भाषा कोण करतंय, राजनाथ सिंहांनी नाव सांगावं आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना वडेट्टीवार म्हणाले की, काँग्रेस आरक्षणाच्या संरक्षणासाठी ठामपणे उभी आहे. भाजपमधीलच काही लोक आरक्षण हटवण्याची भाषा करत असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे राजनाथ सिंह यांनी केवळ सर्वसाधारण वक्तव्य न करता आरक्षण बंद करण्याची भाषा कोण करत आहे, त्यांची नावे जाहीर करावीत, असे ते म्हणाले. “आरक्षण आम्ही संपवणार नाही. मग आरक्षण बंद करण्याची भाषा कोण करत आहे? राजनाथ सिंह यांनी त्यांची नावे सांगावीत,” असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. आरक्षणाच्या बाबतीत संविधानिक चौकट आणि न्यायालयीन निकषांचे पालन झाले पाहिजे, अशी काँग्रेसची भूमिका असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. कोणाच्या दबावामुळे किंवा राजकीय घोषणांमुळे घेतलेले निर्णय न्यायालयात टिकणार नसतील, तर त्याचा उपयोग होणार नाही, असेही त्यांनी म्हटले. जरांगेंच्या आंदोलनावर वडेट्टीवारांची भूमिका स्पष्ट मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला 28 ऑगस्टपर्यंतची मुदत दिल्याबाबतही वडेट्टीवार यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर त्यांनी काँग्रेसची भूमिका स्पष्ट असल्याचे सांगितले. “जरांगे आणि सरकारमध्ये काय चर्चा होते, कोण मंत्री तिकडे जातात किंवा कोण उपोषण करतात, याच्याशी आम्हाला देणंघेणं नाही. आमची भूमिका स्पष्ट आहे. जातनिहाय जनगणना करा आणि आमच्या वाट्याचे आरक्षण आम्हाला द्या,” असे वडेट्टीवार म्हणाले. आरक्षणाच्या प्रश्नावर जे निर्णय घेतले जातील ते संविधानाच्या आणि न्यायाच्या चौकटीत असणे आवश्यक आहे. बोगस किंवा नियमबाह्य निर्णय घेतले गेले तर ते न्यायालयात टिकणार नाहीत, असेही त्यांनी नमूद केले. तुकाराम मुंढेंच्या निर्णयावर सरकारने घेतलेली भूमिका योग्य खाद्यतेलाच्या विक्रीशी संबंधित तुकाराम मुंढे यांच्या निर्णयावरून निर्माण झालेल्या वादावरही वडेट्टीवार यांनी भाष्य केले. संबंधित निर्णयामुळे छोट्या व्यावसायिकांवर, विशेषतः तेली समाजावर अन्याय होण्याची शक्यता होती, असे त्यांनी सांगितले. “हा निर्णय मुळातच चुकीचा होता. मंत्रिमंडळाने किंवा सरकारने तो निर्णय रद्द केला असेल, तर हा चांगला निर्णय आहे. या निर्णयाविरोधात आम्ही सातत्याने मागणी केली होती,” असे वडेट्टीवार म्हणाले. खुल्या तेलाचा वापर गरीब आणि मध्यमवर्गीय नागरिक मोठ्या प्रमाणावर करतात. त्यांच्या आर्थिक क्षमतेनुसार ते तेल खरेदी करतात. त्यामुळे या प्रकारच्या विक्रीवर निर्बंध आल्यास सामान्य ग्राहकांसोबतच छोट्या व्यावसायिकांचेही नुकसान झाले असते. मात्र मोठ्या उद्योगांना त्याचा फायदा होण्याची शक्यता असल्याने हा निर्णय घेण्यात आला होता का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर राहुल गांधी गंभीर पुण्यात झालेल्या ‘छात्रों की गुंज’ कार्यक्रमात आदिवासी विद्यार्थिनीने मांडलेल्या समस्यांची राहुल गांधी यांनी गंभीर दखल घेतल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले. आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. आश्रमशाळा, शिष्यवृत्ती, शुल्क आणि सरकारकडून वेळोवेळी जारी करण्यात येणाऱ्या नव्या नियमांमुळे विद्यार्थ्यांच्या अडचणी वाढत असल्याचा दावा त्यांनी केला. आदिवासी विद्यार्थिनीने राहुल गांधी यांच्यासमोर आपल्या समस्या मांडल्या. तिच्या वेदना आणि प्रश्न राहुल गांधी यांनी गांभीर्याने घेतले असून, यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून चर्चा करून तोडगा काढण्याची मागणी केल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले. “मुख्यमंत्र्यांनी हा विषय प्राधान्याने घ्यावा आणि आदिवासी विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवावेत,” अशी मागणी त्यांनी केली. आदिवासी मुलींच्या ‘प्रेग्नन्सी टेस्ट’च्या निर्णयावरही आक्षेप आदिवासी विद्यार्थिनींशी संबंधित काही नियमांवर वडेट्टीवार यांनी तीव्र आक्षेप घेतला. विशेषतः सुट्टीनंतर आश्रमशाळेत परतणाऱ्या विद्यार्थिनींच्या संदर्भात गर्भधारणा चाचणी करण्याच्या प्रकारावर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. अशा प्रकारच्या नियमांमुळे आदिवासी विद्यार्थिनींच्या चारित्र्यावरच संशय निर्माण होत असल्याचा आरोप त्यांनी केला. विद्यार्थिनींच्या सन्मानाचा आणि मानसिक स्थितीचा विचार करून सरकारने अशा निर्णयांचा पुनर्विचार करावा, अशी मागणी त्यांनी केली. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरणाऱ्यांना काँग्रेसचा पाठिंबा विद्यार्थी आणि तरुणांच्या प्रश्नांवर आंदोलन करणाऱ्या कोणत्याही संघटनेला काँग्रेसचा विरोध नसल्याचे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले. शिक्षणव्यवस्थेतील भ्रष्टाचार, विद्यार्थ्यांच्या समस्या आणि तरुणांच्या भवितव्याशी संबंधित प्रश्नांवर रस्त्यावर उतरणाऱ्यांच्या पाठीशी काँग्रेस उभी राहील, असे त्यांनी सांगितले. “विद्यार्थी आणि तरुण हे देशाचे भविष्य आहेत. त्यांच्या शिक्षणाशी खेळ केला जात असेल, तर त्याविरोधात आवाज उठवला पाहिजे,” अशी भूमिका त्यांनी मांडली. राहुल गांधींचा नागपूर दौरा; ‘छात्रों की गुंज’ कार्यक्रमाची तारीख लवकरच राहुल गांधी यांचा नागपूर दौरा ठरल्याची माहितीही वडेट्टीवार यांनी दिली. नागपुरात ‘छात्रों की गुंज’ कार्यक्रम आयोजित केला जाणार असून, त्याची निश्चित तारीख अद्याप ठरलेली नसल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाची तारीख निश्चित झाल्यानंतर ती जाहीर करण्यात येईल. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना राजकीय पातळीवर आवाज देण्यासाठी राहुल गांधी नागपुरात येणार असल्याचे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले. देवेंद्र फडणवीस पंतप्रधान व्हावेत, ही आमची इच्छा देवेंद्र फडणवीस यांच्या राष्ट्रीय राजकारणातील संभाव्य भूमिकेबाबत विचारलेल्या प्रश्नावर वडेट्टीवार यांनी सूचक वक्तव्य केले. फडणवीस हे भाजपच्या संसदीय मंडळात पुन्हा निवडून आलेले आहेत आणि ते महाराष्ट्राचे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले आहेत. त्यामुळे भाजपमध्ये त्यांना भविष्यात कोणती जबाबदारी द्यायची, हा त्या पक्षाचा अंतर्गत विषय असल्याचे त्यांनी म्हटले. मात्र, “देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान व्हावे, अशी आमची इच्छा आहे,” असे वडेट्टीवार म्हणाले. त्याचबरोबर त्यांना महाराष्ट्रापुरते मर्यादित ठेवले जाणार की राष्ट्रीय राजकारणात पुढे नेले जाणार, हे आगामी काळात स्पष्ट होईल, असेही त्यांनी नमूद केले. 5 सप्टेंबरच्या आंदोलनालाही पाठिंबा विद्यार्थी आणि शिक्षणव्यवस्थेच्या प्रश्नांवर 5 सप्टेंबरला होणाऱ्या आंदोलनाबाबतही वडेट्टीवार यांनी सकारात्मक भूमिका घेतली. विद्यार्थ्यांच्या आणि तरुणांच्या प्रश्नांसाठी जे कोणी रस्त्यावर उतरतील, त्यांच्या पाठीशी काँग्रेस उभी राहील, असे त्यांनी सांगितले. शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचार आणि विद्यार्थ्यांच्या समस्यांकडे सरकारने गांभीर्याने पाहिले पाहिजे. तरुणांच्या भवितव्याशी संबंधित प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्यास त्याचा परिणाम आगामी काळात सरकारला भोगावा लागू शकतो, असा इशाराही त्यांनी दिला. हेही वाचा… देवेंद्र फडणवीसांची दिल्लीला जाण्याची आवराआवर: कुंभमेळ्याच्या निधीत 27 कोटींचा भ्रष्टाचार? संजय राऊतांचा मोदी सरकारसह सरन्यायाधीशांवर निशाणा नवी दिल्ली येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी राज्यातील महायुती सरकार, भाजप आणि थेट सर्वोच्च न्यायालयाच्या कार्यपद्धतीवर सडकून टीका केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लवकरच दिल्लीला रवाना होणार असून, त्याआधी ते राज्यातील प्रलंबित कामे उरकून आपली माणसे महत्त्वाच्या पदांवर बसवण्याची आवराआवर करत असल्याचा मोठा दावा राऊत यांनी केला आहे. यासोबतच नाशिकच्या कुंभमेळ्यातील भ्रष्टाचार, विमानतळांचे खासगीकरण आणि आदिवासींच्या प्रश्नांवरून त्यांनी सरकारला धारेवर धरले. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *