![]()
कोरोना काळापासून बंद असलेला वडाळी तलाव आणि उद्यानाच्या सौंदर्यीकरणाचे काम सध्या सुरू आहे. यासाठी शासनाने २० कोटी रु.चा निधी मंजुर केला असला तरी अद्याप निधीच आला नसल्याने कामाच्या गतीवर परिणाम झाला आहे. या प्रकल्पाला लवकरात लवकर पूर्ण करण्याचे मनपा स्तरावर प्रयत्न सुरू असून याअंतर्गतच महापौर श्रीचंद तेजवानी यांनी गुरुवारी ९ रोजी वडाळी उद्यानाच्या सौंदर्यीकरण प्रकल्पाची पाहणी केली. या प्रकल्पामुळे शहरातील नागरिकांना आधुनिक सुविधा व आकर्षक पर्यटनस्थळ उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. वडाळी उद्यानात राबवण्यात येत असलेल्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामध्ये विविध आकर्षक व उपयुक्त घटकांचा समावेश करण्यात आला आहे. महापौरांनी संबंधित अधिकाऱ्यांना गुणवत्तापूर्वक व दर्जेदार पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. नागरिकांसाठी अधिक हिरवळ, आरोग्यदायी वातावरण आणि विरंगुळ्याचे उत्तम साधन उपलब्ध करून देणे हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.कारण शहरात सध्या छत्री तलावाचे कामही अपूर्ण असून येथील उद्यानात वावरण्याचा नागरिकांना आनंद घेता येत नाही. तेही बंद आहे. अशात जर वडाळी उद्यान पूर्णपणे विकसित होऊन सुरू झाले तर नागरिकांना एक उत्तम पर्यटन स्थळ मिळेल, सोबतच महानगर पालिकेलाही उत्पन्नाचे एक साधन मिळेल. या पाहणी दौऱ्यात सभागृह नेते चेतन गावंडे, नगरसेविका ममता आवारे, पंचफुला चव्हाण, नगरसेवक विक्की उर्फ विशाल वानखडे, सैय्यद राशद अली, शहर अभियंता रवींद्र पवार, सहाय्यक आयुक्त नितीन बोबडे, जनसंपर्क अधिकारी भुषण पुसतकर, अभियंता राजेश आगरकर, माजी महापौर अशोक डोंगरे तसेच संबंधित विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. या सुविधांमुळे वडाळी उद्यान ठरणार मुख्य आकर्षण हिस्ट्री गार्डन, फूड कोर्ट एरिया, फ्लॉवर गार्डन, ग्रीन जिम, कॉनटूर लॉन, सायकलिंग ट्रॅक, फाऊंटेन, चिल्ड्रन प्ले एरिया तसेच साहसी उपक्रमांसाठी विशेष जागा विकसित करण्यात येत आहे. तसेच नागरिकांच्या सोयीसाठी पार्किंग एरिया, ‘वाइल्ड अ ग्लो’ गार्डन, मेझ गार्डन, जिने, दिव्यांगांसाठी रॅम्प, तसेच सुंदर तलाव यांचाही प्रकल्पात समावेश आहे. या सर्व सुविधांमुळे वडाळी उद्यान हे शहरातील प्रमुख आकर्षण ठरणार आहे.
Source link
वडाळी उद्यानाचे रूप बदलणार:महापौर श्रीचंद तेजवानी यांनी केली प्रकल्पाची पाहणी