Headlines

ज्येष्ठ काँग्रेस नेते अनंतराव थोपटे यांचे निधन:पुण्यात श्रद्धांजली सभेत मान्यवरांनी वाहिली आदरांजली, राज्याने गमावले निष्ठावंत नेतृत्व




ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि माजी मंत्री अनंतराव थोपटे यांच्या निधनानंतर पुण्यात श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आली. या सभेत विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी त्यांना आदरांजली वाहिली. थोपटे यांच्या निधनाने राज्याच्या राजकारणातील एक निष्ठावंत, संघर्षशील आणि विकासाभिमुख नेतृत्व हरपल्याची भावना व्यक्त करण्यात आली. पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित या श्रद्धांजली सभेला माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, हर्षवर्धन पाटील, आमदार राहुल कुल यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यात माजी आमदार उल्हास पवार, अशोक मोहोळ, अशोक पवार, माजी महापौर अंकुश काकडे, मोहन जोशी, काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, दिप्ती चवधरी, पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य सभापती मंगलदास बांदल, मुरलीधर निंबाळकर, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष देविदास भन्साळी, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष जालिंदर कामठे, किरण गुजर, पत्रकार अशोक वानखेडे आणि संजय आवटे यांचा समावेश होता. यावेळी बोलताना माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी अनंतराव थोपटे यांच्या राजकीय प्रवासाचा आढावा घेतला. काँग्रेसविरोधात अपक्ष म्हणून निवडून आल्यानंतरही त्यांनी काँग्रेसची विचारधारा कधी सोडली नाही, असे पवार म्हणाले. भोर-वेल्हेच्या दुर्गम भागातील विकास, शिक्षण संस्था, साखर कारखाना, दुग्धविकास आणि शेतकरी हिताचे अनेक उपक्रम राबवत त्यांनी प्रभावी नेतृत्व उभे केले. त्यांच्या जाण्याने राज्याच्या सार्वजनिक जीवनाचे मोठे नुकसान झाल्याचेही त्यांनी नमूद केले. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी थोपटे यांच्या दुग्धक्रांतीतील योगदानाचा उल्लेख केला. त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे थोरात म्हणाले. हर्षवर्धन पाटील यांनी थोपटे यांनी सत्तेचा कधीही गर्व न बाळगता सर्वसामान्यांसाठी काम केल्याचे सांगितले. माजी आमदार उल्हास पवार यांनी थोपटे यांनी लोकशाही आणि पक्षनिष्ठेशी कधीही प्रतारणा केली नाही, असे नमूद केले. शिक्षण, सहकार आणि क्रीडा क्षेत्रातील त्यांच्या कार्याची त्यांनी आठवण करून दिली. माजी खासदार अशोक मोहोळ यांनी दुग्धविकास मंत्री म्हणून थोपटे यांनी राज्यात दुधाचा महापूर आणल्याचे आवर्जून सांगितले आणि काँग्रेसवरील त्यांची निष्ठा अधोरेखित केली. पत्रकार अशोक वानखेडे यांनी अनंतराव थोपटे म्हणजे संघर्ष आणि निष्ठेचे दुसरे नाव असल्याचे म्हटले. संजय आवटे यांनी भोर, वेल्हे आणि मुळशी परिसराचे नंदनवन करण्यामागे थोपटे यांचे मोठे योगदान असल्याचे नमूद केले. आमदार राहुल कुल यांनी थोपटे आणि त्यांचे वडील सुभाषअण्णा कुल यांच्यातील जिव्हाळ्याच्या संबंधांची आठवण करून देत, सुसंस्कृत राजकारणाचा त्यांचा वारसा पुढे नेण्याचे आवाहन केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *