![]()
हिंगोली जिल्ह्यात शनिवारी ता. १३ वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे कळमनुरी व वसमत तालुक्यात केळी पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. प्राथमिक अंदाजानुसार केळीच्या बागांचे सुमारे २० कोटी रुपयांचे नुकसान असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. तर हिंगोली तालुक्यातील पहेणी येथे ६० ते ७० घरावरील टीनपत्रे उडून गेली आहेत. हिंगोली जिल्हयात वसमत व कळमनुरी तालुक्यात केळीचे पिक अधिक प्रमाणात घेतले जाते. सध्या केळीचे घड काढणीला आले असून काही ठिकाणी घडांची काढणी करून विक्रीही केली जात आहे. नांदेड व इतर ठिकाणी केळीला सध्याच्या स्थितीत २६५० रुपये क्विंटल दर मिळत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. दरम्यान, जिल्हयात शनिवारी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला आहे. वादळी वाऱ्यामुळे केळीच्या बागा उध्वस्त झाल्या आहेत. वसमत तालुक्यातील बागलपार्डी, कुरुंदा, गिरगाव, वसमत यासह परिसरात केळीच्या् बागा उध्वस्त झाल्या आहेत. तसेच कळमनुरी तालुक्यात डोंगरकडा, सालापूर, रेडगाव, वडगाव, डिग्रस, दांडेगाव, जवळा पांचाळ या भागात केळीचे नुकसान झाले आहेत. या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले आहेत. त्यानुसार उपविभागीय अधिकारी प्रतिक्षा भुते, विकास माने, तहसीलदार जीवककुमार कांबळे, सागर ननावरे तातडीने मंडळ अधिकारी व तलाठी यांची पथके स्थापन करून पंचनामे सुरु केले आहेत. प्राथमिक अंदाजानुसार वसमत तालुक्यात ४० हेक्टर क्षेत्रावरील केली पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दोन तालुक्यात मिळून एकंदरीत २० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची शक्यता शेतकरी पराग अडकिणे यांनी व्यक्त केली आहे. कळमनुरी तालुक्यात झालेल्या नुकसानीची आमदार संतोष बांगर तर वसमत तालुक्यात आमदार राजेश नवघरे यांनी भेट देऊन पाहणी केली. तर हिंगोली तालुक्यातील पहेणी येथे भाजपाचे प्रदेश पदाधिकारी शिवाजी मुटकुळे यांनी भेट दिली आहे. दरम्यान, प्रशासनाकडून पंचनाम्यांचे काम सुरु असून रविवारी तात. १४ दिवसभर अधिकारी व पथकाने पंचनामे केले आहेत. सोमवारी ता. १६ नेमके नुकसानीची आकडेवारी हाती येणार असल्याचे सुत्रांनी सांगितले. आता शेतकऱ्यांना शासनाच्या मदतीची प्रतिक्षा आहे.
Source link
हिंगोली जिल्ह्यात वादळी वाऱ्याने केळीच्या बागा उध्वस्त:20 कोटींचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज, प्रशासाकडून पंचनामा सुरु