![]()
सततच्या दुष्काळी परिस्थितीशी दोन हात करणाऱ्या पाथर्डी तालुक्यातील जिरेवाडी गावाने शासकीय मदतीची वाट न पाहता लोकसहभागाच्या बळावर जलसंधारणाचा एक नवा आणि आदर्श पॅटर्न निर्माण केला आहे. गावातील नदीवरील सिमेंट बंधाऱ्याचे खोलीकरण व रुंदीकरण करण्यासोबतच तब्बल ३०० मीटर नदीपात्राचे शास्त्रोक्त पद्धतीने खोलीकरण करण्यात आले आहे. या धडक मोहिमेमुळे आगामी पावसाळ्यात गावात मोठ्या प्रमाणात जलसाठा वाढण्यास मदत होणार असून भूजल पातळी सुधारल्याने शेतीसाठी मुबलक पाणी उपलब्ध होणार आहे. हा संपूर्ण महत्त्वाकांक्षी उपक्रम ‘नाम फाउंडेशन’, ‘टाटा मोटर्स’ आणि जलसंधारण विभागाच्या संयुक्त सहकार्यातून राबवण्यात आला. जलसंधारण विभागाचे कार्यकारी उपअभियंता आनंद रुपनर आणि नाम फाउंडेशनचे संग्राम खलाटे यांच्या तांत्रिक मार्गदर्शनाखाली हे काम कमी कालावधीत पूर्ण करण्यात आले. पाथर्डी तालुका हा मुळातच कमी पर्जन्यमानाचा आणि टंचाईग्रस्त भाग म्हणून ओळखला जातो. अशा परिस्थितीत येथील नदीपात्रातील जुनी अतिक्रमणे हटवून खोलीकरण करण्यात आले आहे. याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे, अतिवृष्टीच्या काळात पाण्याचा निचरा सुरळीत होणार आहे. गावकरी आणि शेतकरी जर एकाच ध्येयाने एकत्र आले, तर कितीही मोठे लोकहिताचे काम उभे राहू शकते. जिरेवाडीतील हा जलसंधारण उपक्रम त्याचे जिवंत उदाहरण आहे, अशा शब्दांत मुकुंद आंधळे यांनी ग्रामस्थांच्या एकजुटीचे कौतुक केले. या मोहिमेत मुकुंद आंधळे यांच्या पुढाकारातून नवनाथ आंधळे, नारायण आंधळे, प्रकाश आंधळे, गहिनीनाथ आंधळे, गणेश आंधळे, रवींद्र आंधळे, राजेंद्र आंधळे, परमेश्वर आंधळे, माणिक आंधळे, शिवाजी दौंड, अंकुश काकडे, बाबासाहेब आंधळे, सोमनाथ आंधळे, विक्रम आंधळे, सदानंद आंधळे, विठ्ठल आंधळे आदींनी परिश्रम घेतले. पाणीप्रश्नासोबतच शेतरस्त्यांचीही अडचण मिटली! जिरेवाडीकरांनी या जलसंधारण कामाच्या माध्यमातून गावाची दुहेरी अडचण दूर केली आहे. नदीपात्रातून काढलेल्या माती आणि गाळाचा कल्पकतेने वापर करत कार्यकर्त्यांनी नदीच्या दोन्ही बाजूंना भक्कम बांध घातले. या बांधांचा उपयोग आता शेतकऱ्यांच्या ये-जा करण्यासाठी सुंदर शेतरस्ते म्हणून केला जात आहे. त्यामुळे पाण्याचा प्रश्न सुटण्यासोबतच शेतकऱ्यांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या ग्रामीण रस्त्यांचा प्रश्नही एकाच खर्चात मार्गी लागला आहे.
Source link
जिरेवाडीकरांनी 300 मीटर नदीपात्राचे केले खोलीकरण:शासकीय मदतीची वाट न पाहता गावाने लोकसहभागातून अडवले पाणी