![]()
आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागात मंगळवारी सायंकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने भीमाशंकर, आहुपे आणि पाटण खोऱ्यात अक्षरशः कहर केला आहे. या संततधार पावसामुळे अनेक ठिकाणी दरडी कोसळून प्रमुख घाटरस्ते बंद झाले असून, परिसरातील काही दुर्गम गावांचा संपर्क पूर्णपणे तुटला आहे. पावसाचा आणि पुराचा सर्वाधिक फटका भातशेतीला बसला असून, हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकऱ्यांनी तातडीने नुकसानीचे पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे. या अतिवृष्टीमुळे परिसरातील रस्ते वाहतुकीचे मोठे नुकसान झाले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. आहुपे खोऱ्यातील आहुपे–बोरघर मार्गावर अनेक ठिकाणी दरडी कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. पाटण खोऱ्यातील भोईरवाडी–कुशिरे मार्गावरील कुशिरे घाटात माती, मोठे दगड आणि झाडे रस्त्यावर आल्याने या भागातील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. याशिवाय, नानवडेकडे जाणारा घाटरस्ता आणि भीमाशंकर–मंचर या अत्यंत वर्दळीच्या मार्गावरील गोहे घाटातही दरडी कोसळल्यामुळे स्थानिक नागरिक आणि प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय प्रवास करू नये डोंगरावरून वाहणाऱ्या पाण्याच्या वेगवान प्रवाहामुळे डोंगर उतारावरील भात खाचरांचे बांध फुटले असून, शेतकऱ्यांनी नव्याने केलेली भातलागवड आणि सुपीक माती पाण्यासोबत वाहून गेली आहे. दरम्यान, आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी प्रशासनाकडून जेसीबीच्या साहाय्याने रस्त्यांवरील मातीचे ढिगारे हटवून मार्ग मोकळे करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. मात्र, पावसाचा जोर अद्यापही कायम असल्याने मदतकार्य आणि साफसफाईच्या कामात प्रशासनाला मोठे अडथळे येत आहेत. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून दरडप्रवण भागातील नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय प्रवास करू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. दिलीपराव वळसे पाटलांकडून प्रशासनाला सूचना या नैसर्गिक आपत्तीची माहिती मिळताच माजी गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील यांनी तत्काळ स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्याच्या आणि उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. त्यांच्या निर्देशानुसार आदिवासी नेते सुभाषराव मोरमारे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश घोलप, तसेच पंचायत समितीचे पदाधिकारी कैलास काळे, ज्योती पारधी, संजय गवारी आणि नंदकुमार सोनावले आदींनी तातडीने आपत्तीग्रस्त भागांना प्रत्यक्ष भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. पाहणी दौऱ्यानंतर लोकप्रतिनिधींनी आपत्तीग्रस्त नागरिकांशी संवाद साधून त्यांना धीर दिला. “दरडग्रस्त भागातील नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देऊन बंद झालेले रस्ते त्वरित सुरू करावेत, तसेच शेतीच्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना शासकीय मदत मिळवून देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी,” असे निर्देश दिलीपराव वळसे पाटील यांनी दिले. “प्रशासन युद्धपातळीवर रस्ते खुले करण्याचे काम करत असून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाशी संपर्कात राहावे,” असे आवाहन विवेक वळसे पाटील यांनी केले. तसेच, प्रत्येक गावात जाऊन परिस्थितीचा आढावा घेत असून गरजू कुटुंबांना तातडीची मदत मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, अशी ग्वाही सुभाषराव मोरमारे यांनी दिली.
Source link
आंबेगाव तालुक्यात मुसळधार पावसाचा कहर:दरडी कोसळल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला, भातशेतीचे अतोनात नुकसान