![]()
प्रवासात रस्ता चुकल्यानंतर अनोळखी व्यक्तींना रस्ता विचारण्याची आपली सवय असते, पण हीच सवय नागपुरातील एका दाम्पत्याच्या चांगलीच अंगलट आली आहे. नागपूरजवळील बुटीबोरी परिसरात रस्ता विचारण्याच्या बहाण्याने दोन दुचाकीस्वारांनी एका कारचा पाठलाग केला आणि भररस्त्यात चाकूचा धाक दाखवत दाम्पत्याकडील तब्बल सव्वा लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लुटले. या संपूर्ण थरारक घटनेचा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ कारमध्ये मागे बसलेल्या मुलीने आपल्या मोबाईलमध्ये कैद केला आहे. रस्ता विचारणे पडले महागात मिळालेल्या माहितीनुसार, ५ जुलै रोजी सायंकाळच्या सुमारास सुशांत हजारे हे आपली पत्नी आणि मुलीसोबत कारने बुटीबोरीच्या दिशेने प्रवास करत होते. नागपूर-फुकेश्वर-बुटीबोरी या मार्गावरून जात असताना ते रस्ता चुकले. योग्य मार्ग शोधण्यासाठी त्यांनी दुचाकीवरून जाणाऱ्या दोन अनोळखी तरुणांना थांबवले आणि त्यांना रस्ता विचारला. त्या तरुणांनी त्यांना रस्ता तर दाखवला, पण त्यानंतर त्यांच्या मनात पाप शिरले आणि त्यांनी हजारे यांच्या कारचा पाठलाग करण्यास सुरुवात केली. चाकूचा धाक अन् सव्वा लाखांचा ऐवज लंपास काही अंतर पुढे गेल्यानंतर या दुचाकीस्वार तरुणांनी हजारे यांची कार ओव्हरटेक करून अडवली. काही समजण्याच्या आतच या तरुणांनी सुशांत हजारे आणि त्यांच्या पत्नीला चाकूचा धाक दाखवला. जीवे मारण्याची धमकी देत आरोपींनी सुशांत यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी आणि त्यांच्या पत्नीच्या गळ्यातील मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून घेतले. लुटण्यात आलेल्या या दागिन्यांची एकूण किंमत सुमारे १ लाख २६ हजार रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. लूटमार केल्यानंतर या चोरट्यांनी दुचाकीवरून धूम ठोकली. मुलीच्या प्रसंगावधानाने ‘तो’ थरार कॅमेऱ्यात कैद ज्यावेळी आरोपी चाकूचा धाक दाखवून हजारे दाम्पत्याला लुटत होते, त्यावेळी कारच्या मागच्या सीटवर बसलेल्या त्यांच्या मुलीने प्रचंड प्रसंगावधान दाखवले. तिने न घाबरता या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये गुपचूप रेकॉर्ड केला. या व्हिडिओमध्ये आरोपींच्या हातात चाकू आणि त्यांची गुंडगिरी अत्यंत स्पष्टपणे दिसत आहे. हा व्हिडिओ आता सोशल मीडियावरही समोर आला असून तो या गुन्ह्यातील सर्वात मोठा आणि महत्त्वाचा पुरावा मानला जात आहे. नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त या घटनेनंतर काही स्थानिक नागरिकांनी आरोपींचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र आरोपींनी रस्ता बदलून पळ काढला. या प्रकरणी बुटीबोरी पोलिस ठाण्यात अज्ञात दोन आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, घटनेला तीन दिवस उलटून गेले आहेत आणि आरोपींचा चेहरा व्हिडिओमध्ये कैद होऊनही पोलिस अद्याप त्यांच्यापर्यंत पोहोचू शकलेले नाहीत. पोलिसांच्या या संथ तपासावर आता नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. हेही वाचा.. कल्याण मारहाण प्रकरण: श्रीकांत शिंदेंचे कठोर कारवाईचे आदेश; गुंडांची चड्डी-बनियानवर धिंड काढा, संजय राऊतांचा संताप कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयामध्ये काल (मंगळवारी) एका महिला डॉक्टर, नर्स आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांना थेट मारहाण आणि धक्काबुक्की केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला होता. सत्ताधारी शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे माजी नगरसेवक रमेश म्हात्रे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर या मारहाणीचा गंभीर आरोप करण्यात आला असून, या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. या घटनेचे तीव्र पडसाद आता राजकीय वर्तुळातही उमटू लागले असून, शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी यावरून राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. सविस्तर वाचा केडीएमसीतील डॉक्टरांवरील हल्ल्याप्रकरणी सरकारची कडक भूमिका:’मारहाण अयोग्य, चौकशी करून कारवाई होणार’, आबिटकर-कदम यांचा इशारा केडीएमसी रुग्णालयातील डॉक्टर आणि परिचारिकांवरील मारहाणीच्या घटनेनंतर राज्य सरकारने कठोर भूमिका घेतली आहे. सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी डॉक्टरांना मारहाण करणे पूर्णपणे चुकीचे असल्याचे स्पष्ट करत नागरिकांनी तक्रारींसाठी कायदेशीर मार्गाचा अवलंब करावा, असे आवाहन केले. तर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले आहे. या घटनेनंतर डॉक्टरांनी संप पुकारल्याने आरोग्य सेवेवर परिणाम झाला असून, याच पार्श्वभूमीवर दोन्ही मंत्र्यांनी माध्यमांशी संवाद साधला. सविस्तर वाचा..
Source link
नागपुरात चाकूचा धाक दाखवत दाम्पत्याला लुटलं- VIDEO:कारच्या मागील सीटवर बसलेल्या मुलीने कॅमेऱ्यात कैद केला थरार