![]()
राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवडमधून एक मोठी दुर्घटना समोर आली आहे. मोशी कचरा डेपो परिसरातील दोन मजली इमारत अचानक कोसळल्याने एकच खळबळ उडाली आहे. या दुर्घटनेत सुमारे 10 ते 14 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत असून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मोशी कचरा डेपोजवळील दोन मजली इमारत अचानक पत्त्यांच्या बंगल्यासारखी कोसळली. इमारत कोसळली तेव्हा आतमध्ये अनेक नागरिक असल्याचे सांगितले जात आहे. प्रत्यक्षदर्शी आणि स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, किमान 10 ते 14 जण ढिगाऱ्याखाली अडकले असावेत, अशी भीती व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. त्यानंतर अग्निशमन दलाच्या गाड्या, बचाव पथके आणि इतर आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू असून जेसीबी आणि इतर यंत्रसामग्रीच्या मदतीने ढिगारा हटवण्याचे काम सुरू आहे. घटनास्थळी रुग्णवाहिकाही तैनात करण्यात आल्या असून जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलवण्याची तयारी करण्यात आली आहे. या दुर्घटनेमागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. इमारत मुसळधार पावसामुळे कोसळली की इतर कोणते कारण होते, याचा तपास सुरू आहे. तसेच संबंधित इमारत अधिकृत होती की अनधिकृत, याबाबतही प्रशासनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. दरम्यान, प्रशासनाकडून बचावकार्याला प्राधान्य देण्यात आले असून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या सर्व नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मृत किंवा जखमींचा अधिकृत आकडा अद्याप जाहीर करण्यात आलेला नसून प्रशासनाकडून पुढील माहितीची प्रतीक्षा आहे.
Source link
मोठी दुर्घटना! पुण्यात दोन मजली इमारत कोसळली:14 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती, बचावकार्य युद्धपातळीवर