![]()
सांगलीत एका मोर्चादरम्यान भाजपचे आमदार महेश लांडगे यांनी केलेल्या एका वक्तव्यावरून आता राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. लांडगे यांच्या या विधानाचे राजकीय पडसाद उमटत असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरदचंद्र पवार पक्ष) खासदार सुप्रिया सुळे यांनी यावर अतिशय कडक शब्दांत आक्षेप नोंदवला आहे. प्रक्षोभक भाषा वापरणाऱ्या या आमदारावर तातडीने गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी, अशी आक्रमक मागणी सुळे यांनी केली आहे. ‘आमदारांना आवरा, अन्यथा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल’ या मुद्यावरून राज्य सरकारवर निशाणा साधताना सुप्रिया सुळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली आहे. “माझी राज्याच्या गृहमंत्र्यांना विनंती आहे की, त्यांनी अशा वाचाळवीर आमदारांना वेळीच आवरावे. अशा प्रक्षोभक वक्तव्यांमुळे राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो. आणि जर असे झाले, तर यामध्ये नाहक सर्वसामान्य आणि निष्पाप माणूस भरडला जाईल,” अशी भीती सुळे यांनी व्यक्त केली आहे. ‘अशा आमदारांवर कारवाई करून अटक झालीच पाहिजे’ आमदार महेश लांडगे यांच्या भाषेवर तीव्र संताप व्यक्त करत सुप्रिया सुळे म्हणाल्या की, समाजात तेढ निर्माण करणारी आणि प्रक्षोभक भाषा वापरणाऱ्या सगळ्या आमदारांवर कारवाई झालीच पाहिजे. केवळ कारवाईच नव्हे, तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली पाहिजे, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली. ‘हा शिवराय, शाहू, फुले, आंबेडकरांचा महाराष्ट्र’ महाराष्ट्राच्या राजकीय आणि पुरोगामी संस्कृतीची आठवण करून देताना सुळे यांनी सत्ताधाऱ्यांना थेट इशारा दिला. “हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. हा राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र आहे. या शिवरायांच्या महाराष्ट्रात अशी गुन्हेगारी प्रवृत्तीची आणि दडपशाहीची भाषा अजिबात खपवून घेतली जाणार नाही,” असे खडे बोल सुप्रिया सुळे यांनी सुनावले आहेत. हेही वाचा.. बारामतीत रोहित पवारांच्या पीएच्या मुलीचा रहस्यमय मृत्यू: आईशी भांडण झाल्याने घर सोडलेल्या 9 वीतील विद्यार्थिनीचा मृतदेह आढळला, मृत्यूचे कारण अस्पष्ट बारामती तालुक्यातील रुई गावच्या हद्दीत एका नाल्याजवळ आमदार रोहित पवार यांच्या पीएच्या इयत्ता नववीत शिकणाऱ्या मुलीचा अवनी अजित दशावतारे या विद्यार्थिनीचा मृतदेह रविवारी आढळून आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आईसोबत झालेल्या वादानंतर अवनी घर सोडून निघून गेली होती. त्यानंतर हा प्रकार समोर आला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. मुलीच्या मृत्यूचे अचूक कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे खरे कारण समोर येईल, असे पोलिसांनी सांगितले. या घटनेची माहिती मिळताच आमदार रोहित पवार यांनी तातडीने बारामतीत दाखल होत पीडित कुटुंबाची भेट घेतली आणि पोलिसांकडून प्रकरणाची माहिती घेतली. सविस्तर वाचा
Source link
प्रक्षोभक भाषा करणाऱ्या आमदारांवर गुन्हे दाखल करून अटक करा:सुप्रिया सुळेंची फडणवीसांकडे मागणी, महेश लांडगेंच्या वक्तव्यावरून संताप