Headlines

पुण्यात राजपूत महिलांचा ‘सावन मिलन’ सोहळा उत्साहात:क्षत्राणी सन्मान सोहळ्यात महापौर नागपुरेंकडून शौर्य-त्यागाच्या परंपरेचे कौतुक




पुणे येथे समस्त राजपूत महिला संघातर्फे आयोजित सावन मिलन कार्यक्रमात ‘क्षत्राणी सन्मान सोहळा’ पार पडला. यावेळी महापौर मंजुषा नागपूरे यांनी राजपूत महिलांच्या शौर्य, त्याग, देशभक्ती आणि संस्कारांच्या परंपरेचे कौतुक केले. आधुनिक काळातील राजपूत महिला शिक्षण, समाजसेवा, व्यापार आणि राजकारण यासह विविध क्षेत्रांत महत्त्वपूर्ण योगदान देत असल्याचे त्या म्हणाल्या. या कार्यक्रमाला चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेता महाले-पाटील, उत्तर प्रदेशच्या माजी महिला कल्याण मंत्री स्वाती सिंह, लोकसंगीत साम्राज्ञी कोकीला मिश्रा, गुजरातच्या महामंडलेश्वर मनीषा नंदगिरी यांच्यासह संघाच्या अध्यक्षा मीनल यज्ञदत्तसिंह हजारे, उपाध्यक्षा पूनम परदेशी, कार्याध्यक्षा अंजली परदेशी आदी उपस्थित होत्या. यावेळी आमदार श्वेता महाले-पाटील, वैजापूरच्या महिला मोर्चा सचिव शिल्पा परदेशी, पत्रकार प्रभा सिंह, तलवारबाजी प्रशिक्षिका सोनलबा पढीयार आणि हास्य-व्यंगकार वर्षा राव यांचा विशेष सन्मान करण्यात आला. या सोहळ्यात राजपूत महिला पारंपरिक वेशभूषेत उपस्थित होत्या. त्यांनी तलवारबाजीचे प्रात्यक्षिक सादर केले, तसेच राजपूती पारंपरिक घूमर नृत्य सादर करून कार्यक्रमात रंगत आणली. आमदार श्वेता महाले-पाटील यांनी महाराष्ट्रातील राजपूत समाजाच्या मोठ्या संख्येचा उल्लेख केला. ‘वीर शिरोमणी महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळ’ स्थापनेसाठी केलेल्या पाठपुराव्याबद्दल आणि चिखली येथे राजपूत समाज सभागृहासाठी जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल मिळालेला सन्मान महत्त्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले. राजपूत समाजाच्या समस्या सरकारपुढे मांडून वंचितांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी यापुढेही प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी नमूद केले. उत्तर प्रदेशच्या माजी महिला कल्याण मंत्री स्वाती सिंह यांनी न्यायव्यवस्थेच्या संथ गतीवर चिंता व्यक्त केली. लहान मुलींपासून ज्येष्ठ महिलांपर्यंत सर्वांना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देणे आवश्यक असल्याचे त्या म्हणाल्या. महिलांनी आत्मनिर्भर होणे ही काळाची गरज असून, मुलींना केवळ बाहुल्या देण्याऐवजी त्यांना स्वसंरक्षणाचे धडे आणि आवश्यक कौशल्ये शिकवणे अधिक महत्त्वाचे आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *