Headlines

अश्व क्षेत्रासाठी राज्य सरकार करणार सामंजस्य करार:मंत्री पंकजा मुंडेंची घोषणा, संस्थांशी सहकार्य करून देणार उभारी




अश्व क्षेत्राच्या परिसंस्थेला बळकटी देण्यासाठी राज्य सरकार विविध संस्थांशी सहकार्य करण्यास आणि विद्यापीठांशी जोडले जाण्यास तत्पर असेल. यासाठी संस्थांशी सामंजस्य करार (MoU) करण्याची घोषणा राज्याच्या पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केली. ‘द इक्वेस्ट्रियन फोरम २०२६’ या राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. एमआयटी वर्ल्डपीस युनिव्हर्सिटीच्या अधिपत्याखालील ‘द इक्वाइन कलेक्टिव्ह’ संस्थेने या परिषदेचे आयोजन केले होते. या उद्घाटन सोहळ्याला राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी ‘द इक्वाइन कलेक्टिव्ह’च्या संस्थापिका गायत्री कराड, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष डॉ. राहुल कराड, कार्यकारी संचालिका डॉ. आदिती कराड, नॅशनल हॉर्स ब्रीडिंग सोसायटी ऑफ इंडियाचे डॉ. एफ. एफ. वाडिया आणि जयपाल सिंग रावल यांचीही उपस्थिती होती. मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, “अश्व क्षेत्रात केवळ क्रीडाच नाही, तर ग्रामीण विकास, पर्यावरण आणि रोजगार निर्मितीमध्येही प्रचंड क्षमता आहे. नव्या कल्पना नेहमीच आव्हानात्मक असल्या तरी त्या शक्तिशाली असतात. अश्व क्षेत्रासाठी सामूहिक दृष्टिकोन स्वीकारण्याची ही संकल्पना अत्यंत योग्य आणि आवश्यक आहे.” गायत्री कराड यांनी सांगितले की, “देशातील अश्व क्षेत्र हे तीनशे अब्ज डॉलर्सच्या जागतिक अश्व परिसंस्थेचा एक भाग आहे, परंतु ते अजूनही असंघटित आहे. या क्षेत्रातील मनुष्यबळाला औपचारिक प्रशिक्षण आणि प्रमाणीकरणाचा अभाव दिसून येतो. ‘द इक्वेस्ट्रियन फोरम’च्या माध्यमातून कौशल्य विकास, कामाचे प्रमाणीकरण आणि दीर्घकालीन करिअरच्या संधी उपलब्ध करून देणारे व्यासपीठ उभारण्याचा आमचा मानस आहे. या क्षेत्रात कार्यरत हजारो लोकांसाठी शाश्वत संधी निर्माण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.” जयकुमार रावल म्हणाले, “मानव आणि घोडे यांच्यातील नाते विश्वास, शिस्त आणि भावनिक बंधावर आधारित आहे. भारताला अश्व क्षेत्राचा समृद्ध वारसा लाभला आहे. या क्षेत्राचे आधुनिकीकरण करतानाच, हा वारसा जतन करणे आणि त्याचा प्रचार करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अश्व पैदास, अश्व पर्यटन, पशुवैद्यकीय सेवा आणि प्रशिक्षण यांसारख्या क्षेत्रांमध्ये विकासाची मोठी क्षमता उपलब्ध आहे.” डॉ. राहुल व्ही. कराड यांनी नमूद केले की, “‘द इक्वेस्ट्रियन फोरम’सारख्या मंचांच्या माध्यमातून एमआयटी डब्ल्यूपीयूचे उद्दिष्ट शिक्षण, प्राणी कल्याण, क्रीडा विज्ञान आणि नाविन्य यांना परस्परांशी जोडून भारताची ‘इक्वेस्ट्रियन इकोसिस्टम’ अधिक बळकट करणे हे आहे. शाश्वत विकासासाठी शैक्षणिक संस्था, शासन आणि उद्योग क्षेत्र यांच्यातील सहकार्य अनिवार्य आहे.” उद्घाटन सत्रानंतर ‘धोरण आणि प्रशासन’ या विषयावर एक चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. यामध्ये अश्व उद्योगाचे ‘रीब्रँडिंग’ (पुनर्प्रतिष्ठापना) आणि सक्षमीकरण करण्यावर प्रामुख्याने लक्ष केंद्रित करण्यात आले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *