![]()
एकीकडे सरकार ‘पाणी आडवा, पाणी जिरवा’ आणि ‘पाणी काटकसरीने वापरा’ असा संदेश देत असताना, मोहोळ तालुक्यातील कोन्हेरी परिसरात मात्र पाटबंधारे विभागाच्या हलगर्जीपणामुळे उलटाच प्रकार पाहायला मिळत आहे. आष्टी उपसा सिंचन योजनेच्या उजव्या कालव्याला गेल्या ५ वर्षांपासून मोठी गळती लागली असून, यामुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे. या गळतीमुळे ६ शेतकऱ्यांची तब्बल ३० एकर जमीन पाण्याखाली गेल्याने पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकरी आणि जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी आष्टी उपसा सिंचन योजनेतून या कालव्याची निर्मिती करण्यात आली. यातून तासाला १२ हजार ६०० मीटर क्यू इतके पाणी सोडले जाते. मात्र, २०१९ पासून या कालव्याला भगदाड पडले आहे. भारत गुंड, अर्जुन घाडगे, लक्ष्मण गायकवाड यांच्यासह सहा शेतकऱ्यांच्या शेतात हे पाणी घुसल्याने जमीन ‘चिबड’ झाली आहे. यामुळे केळी, मका, ऊस आणि डाळिंब यांसारखी नगदी पिके सडून जात आहेत. शेतकऱ्यांनी अनेकदा उप अभियंता, अधीक्षक अभियंता आणि कार्यकारी अभियंता यांच्याकडे धाव घेतली, मात्र पदरी केवळ आश्वासनेच पडली आहेत. अद्याप प्रत्यक्ष कामाला सुरुवात न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट आहे. या गळतीमुळे भारत दत्तात्रय गुंड (गट नं. ४१७), अर्जुन कृष्णात घाडगे (गट नं. ४१०), लक्ष्मण रामचंद्र गायकवाड (गट नं. १८५) यांच्यासह इतर तीन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. उन्हाळ्यात जेव्हा पाण्याची सर्वाधिक गरज असते, तेव्हा पाणी शेतात साचून पीक खराब होत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. ^रवी गुंड यांच्या शेतालगत असलेल्या गळतीमुळे रस्ता जलमय झाला आहे. वृद्ध आणि मुलांना ये-जा करणे कठीण झाले आहे. आम्ही वारंवार दाद मागूनही दुर्लक्ष होत आहे. या पाण्यातून जाताना एखादा अनुचित प्रकार घडल्यास सर्वस्वी संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरले जाईल. – रामचंद्र गांजाळे, शेतकरी, कोन्हेरी. ^आम्ही घटनास्थळाची पाहणी केली असून गळती होत असल्याचे स्पष्ट आहे. दुरुस्तीसाठी आणि शेतकऱ्यांच्या नुकसानीचा प्रस्ताव मंजुरीसाठी वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवला आहे. मंजुरी मिळताच कामाला प्रत्यक्ष सुरुवात होईल. – शैलेंद्र पवार, उप अभियंता, आष्टी उपसा सिंचन योजना. विद्यार्थी, वृद्धांची कसरत; जीवितहानीची टांगती तलवार, ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप कॅनलच्या गळतीचे पाणी थेट रस्त्यावर येत असल्याने या मार्गावरून जाणाऱ्या अंगणवाडीतील चिमुकल्यांना आणि शाळकरी विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अनेक मुले या पाण्यात घसरून पडली असून किरकोळ जखमी झाली आहेत. पालकांना आपल्या पाल्यांना शाळेत सोडण्यासाठी पाण्यातून कसरत करावी लागत आहे. एखादी मोठी दुर्घटना घडल्यास याला जबाबदार कोण? असा सवाल ग्रामस्थ विचारत आहेत.
Source link
पाटबंधारे विभागाच्या कोन्हेरी कॅनल गळतीमुळे 30 एकर शेती चिखलात:पाच वर्षांपासून गळतीचा प्रकार, लाखो लिटर पाणीजाते वाया