![]()
माझ्या शाळेचा रस्ता म्हणजे केवळ एक पाऊलवाट नसून, माझ्या स्वप्नांचा आणि रोजच्या संघर्षाचा एक चिखलमय प्रवास आहे. जेव्हा उन्हाळ्याच्या दोन महिन्यांच्या सुट्या होत्या, तेव्हा आमची मनपा शांत बसली. पण जसा पावसाळा लागला आणि शाळा सुरू झाली, तसे मनपाने आमच्या केडगाव उपनगरात रस्त्याचे काम हाती घेतले. महाराणी ताराबाई कन्या विद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरील रस्ता काँक्रिटसाठी खोदून ठेवला. विशेष म्हणजे, महापालिकेने आमच्या शाळेच्या चारही बाजूंनी रस्ते खोदून ठेवल्याने आमची शाळा सध्या एखाद्या “बेटासारखी’ भासत आहे. मागील चार दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे या संपूर्ण परिसरात चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले असून एक फुटापर्यंत खोल चिखल साचला आहे. या धोकादायक दलदलीतूनच आम्हाला दररोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. कवी इंद्रजित भालेराव यांची एक कविता आहे, ‘काट्याकुट्यांचा तुडवीत रस्ता, माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता…’ पण आमच्या भागात रोज शाळेत जाताना ही कविता नकळत बदलते… तिचे शब्द होतात, ‘चिखलाचा तुडवीत रस्ता, शाळेकडं चल गं सखी…’ याच ओळी आमच्या रोजच्या संघर्षाचे जिवंत चित्रण आहेत. पावसाळा सुरू झाला की मला अभ्यासापेक्षा शाळेच्या रस्त्याचीच जास्त चिंता वाटते. अनेक मुली या निसरड्या चिखलात घसरून पडल्या आहेत, त्यांचे गणवेश व दप्तरे खराब होत आहेत. बूट घालून चालणे अशक्य असल्याने आम्हाला ते हातात घ्यावे लागतात. पहिली ते बारावीच्या आम्ही ८०० विद्यार्थिनी, आमचे पालक आणि वयोवृद्ध आजी-आजोबा सगळेच त्रस्त आहेत. विकासकामे झालीच पाहिजेत, पण ती कोणत्या वेळी करावीत याची जाण मनपा प्रशासनाला असायला हवी. मनपा आयुक्त काका, जर माझ्या शाळेकडे जाणारा रस्ता चिखलाचा असेल, तर हा रस्ता पार करण्यासाठी मला किती वेळ लागेल? हे गणित माझ्या पुस्तकात नाही, पण याचे उत्तर तुम्हीच द्यावे… पहिली ते बारावीच्या ८०० विद्यार्थिनी या विद्यालयात इयत्ता १ ली ते १२च्या वर्गात एकूण ८०० विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत. मागील ४ दिवसांपासून येथे सतत पाऊस सुरू असून, रस्ता खोदल्यामुळे तब्बल १ फुटापर्यंत खोल चिखल साचला आहे. यातूनच वाट काढून मुलींना जावे लागते.येत्या दोन दिवसांत या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम प्रत्यक्ष सुरू होणार असल्याचे नगरसेवक अमोल येवले यांनी सांगितले. शब्दांकन : महेश पटारे
Source link
‘चिखलाचा तुडवीत रस्ता, शाळेकडं चल गं माझ्या सखी…’,:केडगावच्या महाराणी ताराबाई कन्या विद्यालयाच्या मुलींची व्यथा निबंध स्वरूपात मांडण्याचा हा प्रयोग