![]()
स्थानिक श्री शिवाजी शिक्षण संस्थाद्वारा संचालित श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालयात येथे २०२६-२७ च्या नव्या शैक्षणिक सत्राचा प्रारंभ करण्यात आला. दीक्षारंभ नावाने सुरु झालेल्या या नव्या शैक्षणिक सत्रात नवागतांचे स्वागत करुन त्यांना योग्य त्या सूचना देण्यात आल्या. प्राचार्य डॉ. महेंद्र मेटे यांनी यावेळी विद्यार्थ्यांसह शिक्षकांनाही हितोपदेश केला. महाविद्यालयाने सुरु केलेला हा दीक्षारंभ आगामी ११ जुलैपर्यंत चालणार आहे. नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी या महाविद्यालयात विद्यार्थी दीक्षारंभ कार्यक्रम घेतला जातो. यावर्षीच्या दीक्षारंभाला उत्साहात प्रारंभ झाला. दीक्षारंभानिमित्त विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्यादृष्टीने विविध शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक व व्यक्तिमत्त्व विकास विषयांवरील मार्गदर्शनपर सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाची सुरुवात दररोज प्रा.विश्वास जाधव यांच्या योग सत्राने करण्यात येत आहे. उद्घाटनप्रसंगी क्रार्यक्रमाध्यक्ष प्राचार्य डॉ. महेंद्र मेटे यांनी विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन जीवनातील संधी, शिस्त, मूल्ये आणि जबाबदाऱ्या याविषयी प्रेरणादायी मार्गदर्शन केले तसेच महाविद्यालयाची व ग्रंथालयाची सविस्तर माहिती दिली. डॉ. प्रशांत हरमकर यांनी प्रास्ताविकातून महाविद्यालयाची ओळख करून दिली, तर डॉ. कुलदीपसिंग मोहाडीकर यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाविषयी (एनईपी) सविस्तर माहिती दिली. डॉ. कविता वाटाणे यांनी क्रीडा व शारीरिक विकासाचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. संगीत विभागप्रमुख डॉ. गजानन केतकर, प्रा.मिना सहारे यांनी स्फुर्ती गीत गायन केले. क्रार्यक्रमाचे संचालन डॉ. मनोज जोशी यांनी, तर आभार डॉ. गजानन भारती यांनी मानले. दीक्षारंभाच्या दुसऱ्या दिवशी डॉ. वैशाली टाकोडे यांनी आचारसंहिता, लिंगसंवेदनशीलता, लैंगिक छळ प्रतिबंध तसेच विद्यार्थ्यांच्या हक्क व जबाबदाऱ्यांविषयी मार्गदर्शन केले. यानंतर डॉ. किशोर साबळे, डॉ. संजय कटाईत व डॉ. कुमार बोबडे यांनी महाविद्यालयातील शैक्षणिक अभ्यासक्रमांची माहिती दिली. तसेच किशोर राजगडे, अमोल देशमुख आणि धनंजय देशमुख यांनी प्रवेश प्रक्रिया, परीक्षा प्रणाली व कार्यालयीन कामकाजाविषयी विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली. आज, गुरुवारी विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये डॉ. संगीता भुयार यांनी संविधानिक मूल्ये व राष्ट्रीय एकात्मता या विषयाची मांडणी केली. डॉ. कुलदीपसिंग मोहाडीकर यांनी अँटी-रॅगिंग, डॉ. कुमार बोबडे यांनी कौशल्य विकास व प्लेसमेंट, तर डॉ. अपर्णा सरोदे आणि डॉ. राजेश मिरगे यांनी स्पर्धा परीक्षा व करिअर समुपदेशन या विषयांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या दीक्षारंभ कार्यक्रमाचा उद्देश नवागत विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन वातावरणाशी परिचित करून देणे, संस्थेची संस्कृती व मूल्ये रुजविणे, विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे आणि त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक मार्गदर्शन उपलब्ध करून देणे हा आहे. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रभारी प्राचार्य डॉ. महेंद्र मेटे यांच्या मार्गदर्शनाखाली संयोजक डॉ. राजेश मिरगे, यांच्यासह डॉ. उमेश कडु, डॉ. किशोर साबळे, डॉ. सुजाता सबाने, डॉ. सुर्वणा घाडगे, डॉ.जयराम गायकवाड, डॉ. शिवाजी कानफाडे, डॉ. अपर्णा सरोदे, डॉ. मनोज जोशी, डॉ. डी. एस. नामुर्ते, प्रा.मनिष भंकाळे, प्रा.रुपेश फसाटे, प्रा.मनिषा देशमुख, अधिक्षककिशोर राजगडे, नीता देशमुख, अभिजीत मानकर, अजय मोहोड, शाम पिंजरकर आदी परिश्रम घेत आहेत. आज सांस्कृतिक उपक्रम, उद्या ग्रंथालयाची भेट उद्या, शुक्रवार, १० जुलै रोजी डॉ. राजेश मिरगे व डॉ. गजानन केतकर हे दोघे सांस्कृतिक उपक्रम, डॉ. गजानन भारती व डॉ. वैशाली टाकोडे हे एन सी सी, तर डॉ. मनोज जोशी व डॉ. अपर्णा सरोदे हे राष्ट्रीय सेवा योजना याविषयी माहिती देतील. दरम्यान शुक्रवार, ११ जुलै रोजी विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन ग्रंथालयाची भेट घडवून आणली जाणार आहे. या भेटीनंतर विद्यार्थी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख स्मारक केंद्राला भेट देतील. त्या भेटीनंतर दीक्षारंभाचा रितसर समारोप होणार आहे.
Source link
नवागतांचे स्वागत, प्राचार्यांचा कानमंत्र; महाविद्यालयात रंगला खास ‘दीक्षारंभ':11 जुलैपर्यंत विविध उपक्रमांचे आयोजन, सांस्कृतिक उपक्रमाची सफर