.

येथील अग्रवाल पेट्रोलपंपावर गुरुवारी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास ब्रेक फेल झालेल्या ट्रकने अमरावती शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीला धडक दिली. व्हॉल्व्ह फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले. त्यामुळे शहरवासीयांना गुरुवारी सायंकाळी पिण्याचे पाणी मिळाले नाही. गुरुवारी ज्या परिसरांचा पाणी भरण्याचा दिवस होता, त्यांना आता शनिवारीच पाणी मिळणार आहे. नागरिकांना पाण्यासाठी पुन्हा वणवण भटकावे लागणार आहे.
डिझेल भरण्यासाठी पेट्रोल पंपावर येत असलेल्या यूपी ७८ डीटी ४५७७ क्रमांकाच्या ट्रकचे अचानक ब्रेक निकामी झाले. चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. काही वाहनांना धडक देत ट्रक थेट अप्पर वर्धा धरणातून अमरावतीला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीवर जाऊन आदळला. जोरदार धडकेत जलवाहिनी फुटली. लाखो लिटर पाणी वाया गेले. जलवाहिनी फुटताच तब्बल ५० फूट उंचीपर्यंत पाण्याचे कारंजे उडू लागले. या अनपेक्षित घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. बघ्यांनी मोठी गर्दी केली. काही वेळातच पेट्रोलपंप परिसर आणि आजूबाजूचा भाग पूर्णपणे जलमय झाला.
अपघातात ट्रकने दोन दुचाकी आणि पेट्रोलपंपावरील जनरेटरलाही जोरदार धडक दिली. त्यांचे मोठे नुकसान झाले. तसेच जवळील एका टायर रिमोल्डिंगच्या दुकानात मोठ्या प्रमाणात पाणी शिरले. त्यांचेही मोठे आर्थिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. शेजारील एका हॉटेलमध्येही पाणी शिरले. हॉटेल मालकाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. दरम्यान, परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले. पेट्रोलपंपाच्या जमिनीखालील इंधन टाक्यांमध्ये पाणी शिरण्याची शक्यता लक्षात घेण्यात आली. पेट्रोलपंप व्यवस्थापनाने खबरदारीचा उपाय म्हणून तातडीने इंधन विक्री बंद केली.
या घटनेमुळे आधीच एक दिवसाआड पाणीपुरवठा सहन करणाऱ्या अमरावतीकरांच्या चिंतेत भर पडली आहे. घटनेची माहिती मिळताच महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (मजीप्रा)च्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी तातडीने उपाययोजना सुरू करण्यात आल्या. आधी साचलेले पाणी काढण्यात आले. त्यानंतर दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झाली. गुरुवारी उशिरा रात्रीपर्यंत दुरुस्ती पूर्ण होईल, असे मजीप्राच्या विभागीय कार्यकारी अभियंत्यांनी सांगितले.
उद्या सायंकाळपासून पाणी अनियंत्रित ट्रकने शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीला धडक दिली. यात व्हॉल्व्ह तुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले. उशिरा रात्रीपर्यंत व्हॉल्व्ह दुरुस्त करून शुक्रवारी दुपारपर्यंत शहरात पाणी सोडले जाईल. वेगाने काम सुरू आहे. – संजय लेवरकर, विभागीय कार्यकारी अभियंता, मजीप्रा.
सलग तीन महिन्यांमध्ये तिसरी घटना शहराचा पाणी पुरवठा खंडित होऊन पाण्याविना शहरवासी वेठिस धरले जाण्याची ही सलग तीन महिन्यातील तिसरी घटना आहे. ९ मे रोजी नांदगाव पेठ जवळ जलवाहिनी फुटल्यामुळे शहरवासीयांना तीन दिवस पाणी मिळाले नव्हते. तसेच १५ जून रोजी पार्वतीनगर जलकुंभाची मुख्य वाहिनी फुटली होती. त्यामुळे त्या परिसरातील नागरिकांना चार दिवस पाणी मिळाले नाही. आता अनियंत्रित ट्रकमुळे मुख्य जलवाहिनी फुटल्याने काही भागाला तीन दिवस पाणी मिळणार नाही. पाणी पुरवठा खंडित होत असल्याने शहरवासी त्रस्त झाले आहेत.
शहानिशा पूर्ण झाल्यानंतरच इंधन विक्री अनियंत्रित ट्रकचे ब्रेक निकामी झाल्यामुळे अमरावती शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी फुटली. त्यामुळे अग्रवाल ऑटो सर्व्हिस परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते. ग्राहकांची सुरक्षितता आणि इंधनाच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड होऊ नये, या उद्देशाने खबरदारीचा उपाय म्हणून काही काळ इंधन विक्री तात्पुरती बंद ठेवण्यात आली. पेट्रोलपंपाच्या भूमिगत टाक्यांची आणि इंधनाची आवश्यक शहानिशा पूर्ण झाल्यानंतरच इंधन विक्री पुन्हा सुरू करण्यात येईल. – आझाद अग्रवाल, संचालक, अग्रवाल ऑटो सर्व्हिस