![]()
सोशल मीडियावर महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह लिखाण करून जातीय तेढ निर्माण करणाऱ्या आरोपीविरोधात कठोर कारवाईच्या मागणीसाठी गुरुवारी पाथर्डी शहरात ओबीसी समाजाच्या वतीने भव्य मोर्चा व धरणे आंदोलन करण्यात आले. अजंठा चौकातून निघालेला हा मोर्चा शहरातील प्रमुख मार्गांनी पाथर्डी पोलीस ठाण्यावर धडकला. तेथे पोलिस निरीक्षक आनंद कोकरे यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात, सोशल मीडियाचा गैरवापर करून सामाजिक अशांतता निर्माण करणाऱ्या आरोपीवर ‘भारतीय न्याय संहिता’ आणि ‘अॅट्रॉसिटी’ कायद्यांतर्गत कठोर कलमे लावून सखोल सायबर तपास करावा, तसेच हे प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवावे, अशी मागणी करण्यात आली. मोर्चात प्रा. किसन चव्हाण, किसन आव्हाड, संजय बडे, संजय मरकड यांच्यासह आदी उपस्थित होते. वक्त्यांनी आपल्या भाषणात, तालुक्यात सामाजिक सलोखा बिघडवण्याचा कोणाचाही प्रयत्न यशस्वी होऊ दिला जाणार नाही, असा इशारा दिला. या आक्षेपार्ह लिखाणप्रकरणी बुधवारी सायंकाळी शिवप्रेमी व आंबेडकरी अनुयायांनी पोलीस ठाण्यासमोर आंदोलन केले होते. पाथर्डी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत अवघ्या २४ तासांत जोड मोहोज येथून या प्रकरणातील मुख्य सूत्रधार सूरज वांडेकर याला ताब्यात घेऊन अटक केली आहे. पोस्टप्रकरणी सुरुवातीला शिरसाटवाडी येथील देविदास शिरसाट यांच्यावर संशय व्यक्त करण्यात आला होता. मात्र, पोलिसांच्या तांत्रिक तपासात मूळ आरोपी जोड मोहोजचा सूरज वांडेकर असल्याचे निष्पन्न झाले. कोणत्याही निरपराध व्यक्तीला यात अडकवू नये आणि खऱ्या गुन्हेगारावर कठोर कारवाई व्हावी, अशी भूमिका गुरुवारी ओबीसी समाजाच्या मोर्चेकऱ्यांनी मांडली. पोलिसांनी गुन्हेगाराला शोधल्याबद्दल आंदोलकांनी समाधान व्यक्त केले.
Source link
मुख्य सूत्रधार 24 तासांत जेरबंद:"सोशल'वर महापुरुषांची बदनामीविरोधात पाथर्डी शहरात ओबीसी समाजाचा मोर्चा