Headlines

रहाटगावात संगीतमय श्रीमद् भागवत कथेचे आयोजन:आकाश लक्षणे महाराजांच्या वाणीतून अधिक मासानिमित्त कथा संपन्न




अमरावती नजीकच्या रहाटगाव येथील श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक विकास व बालसंस्कार केंद्राच्यावतीने अधिक मासानिमित्त संगीतमय श्रीमद् भागवत कथेचे आयोजन करण्यात आले होते. श्रीमद् भागवताचार्य, वाणीभूषण गुरुवर्य ह.भ.प. श्री आकाश लक्षणे महाराज यांच्या सुमधुरवाणीतून ही कथा संपन्न झाली. कथेच्या समारोपात महाराजांनी परीक्षित राजाला मिळालेला शाप आणि श्रीमद् भागवत कथेचे महत्त्व विषद केले. त्यांनी सांगितले की, महाभारताच्या युद्धानंतर हस्तिनापूरचे सम्राट बनलेले परीक्षित राजा (अभिमन्यू आणि उत्तरा यांचे पुत्र) यांना शमिक ऋषींचे पुत्र ‘शृंगी’ यांनी शाप दिला होता की, तक्षक नागाच्या दंशामुळे सात दिवसांत त्यांचा मृत्यू होईल. या शापामुळेच त्यांना ‘श्रीमद् भागवत पुराणा’चे ज्ञान प्राप्त झाले. मृत्यूच्या भीतीवर विजय मिळवण्यासाठी शुकदेव मुनींनी राजा परीक्षितला सलग सात दिवस ‘श्रीमद् भागवत कथे’चे ज्ञान दिले. या ज्ञानप्राप्तीमुळे राजा परीक्षित भयमुक्त आणि आत्मज्ञानी झाले. महाराजांनी श्रीमद् भागवत कथेचे मानवी जीवनातील महत्त्व सखोलपणे समजावून सांगितले. तसेच, भगवान श्रीकृष्णांच्या १६,१०८ विवाह कथा आणि सुदामा ब्राह्मणाच्या कथेचा उल्लेख करत भागवत कथेचे महत्त्व अधोरेखित केले. यावेळी टाळ-मृदंगाच्या गजरात महाआरती करण्यात आली. परिसरातील नागरिक आणि भाविक भक्त मोठ्या संख्येने दररोज उपस्थित राहून भागवत कथेचा लाभ घेतला. सप्ताहाची सांगता काला आणि महाप्रसादाने करण्यात आली. श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र, रहाटगाव येथील विश्वस्त मंडळाने कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *