![]()
नागपूर शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट क्र. ५ ने नागरिकांची फसवणूक करणाऱ्या एका आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश केला आहे. नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ‘बिलाल इंटरप्रायजेस’ नावाच्या कार्यालयावर गुरुवारी रात्री धाड टाकून पोलिसांनी ७ आरोपींना रंगेहात अटक केली. आरोपींकडून कार, जीप आणि इतर मुद्देमालासह एकूण २० लाख ४ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. आरोपी जास्तीच्या पैशांचे आमिष दाखवून लोकांना फसवणूक करत होते. हसनबाग पोलीस चौकीसमोर असलेल्या ‘बिलाल इंटरप्रायजेस’मध्ये ५० हजार रुपयांच्या बदल्यात २ लाख रुपये करून मिळतात, अशी माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. या टोळीची फसवणूक करण्याची पद्धत अनोखी होती. ते लोकांकडून खऱ्या नोटा स्वीकारायचे आणि त्यांना ५०० रुपयांच्या नोटांचे बंडल द्यायचे. या बंडलमध्ये वर आणि खाली एक-एक खरी नोट असायची, तर मध्ये मात्र नोटांच्या आकाराचे पांढरे कोरे कागद कापून ठेवलेले असत. १७ जून २०२६ रोजी रात्री ९ ते १० च्या दरम्यान पोलिसांनी पंचांना सोबत घेऊन या कार्यालयावर छापा टाकला. त्यावेळी यवतमाळ येथील २४ वर्षीय निखील आकाश चव्हाण या तरुणाला ही टोळी फसवण्याचा प्रयत्न करत होती. आरोपींनी निखीलकडून खऱ्या नोटा घेऊन त्याला कोऱ्या कागदांचे बंडल दिले. त्याच क्षणी दबा धरून बसलेल्या पोलिसांनी सर्व आरोपींना रंगेहात पकडले. पोलिसांनी घटनास्थळावरून ५०० रुपयांच्या ४९८ खऱ्या नोटा, बनावट नोटांचे बंडल्स, १० मोबाईल फोन, १ लॅपटॉप, रबरी शिक्के आणि चेकबुक जप्त केले. जप्त केलेल्या मुद्देमालामध्ये कार आणि जीपचाही समावेश आहे, ज्याची एकूण किंमत २० लाख ४ हजार रुपये आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये परवेज अहेमद मोहम्मद शरीफ पटेल (वय ५०, रा. हसनबाग – मुख्य मालक), अवतारसिंग जग्गुसिंग जुन्नी (वय ५०, रा. चंद्रपूर), शाहरूख खान मतलूब खान (वय ३१, रा. घुग्घुस), अंकित लिलाधर वासनिक (वय ३०, रा. भंडारा), अंकित राजेंद्र सुर्यवंशी (वय ३५, रा. बैतुल, मध्य प्रदेश), मोहम्मद मन्नन मोहम्मद इद्रिस शेख (वय ३१, रा. खरबी) आणि अदनान उर्फ आशू रोशन खान (वय ३५, रा. हसनबाग, नागपूर) यांचा समावेश आहे.
Source link
नागपुरात 'बिलाल इंटरप्रायजेस'वर धाड:नोटांच्या नावावर कोऱ्या कागदांची बंडले देणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, 7 जणांना अटक