![]()
विज्ञानाचा विषय केवळ पाठांतरापुरता मर्यादित न राहता तो प्रत्यक्ष अनुभवातून समजावा. यासाठी पाथर्डी तालुक्यातील थोरला मळा (करंजी केंद्र) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक प्रवीण शिंदे यांनी अभिनव प्रयोगशील शिक्षणाची वाट निर्माण केली. परिसरात सहज उपलब्ध होणाऱ्या आणि अल्प खर्चातील साहित्याच्या मदतीने विद्यार्थ्यांकडूनच विज्ञानाचे प्रयोग करून घेणाऱ्या ‘लॅब इन हँड’ (प्रयोगशाळा आपल्या हातात) या संकल्पनेतून त्यांनी ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची गोडी निर्माण केली आहे. शिक्षक प्रवीण शिंदे गेल्या अनेक वर्षांपासून विज्ञानातील क्लिष्ट संकल्पना सोप्या, कृतिशील आणि मनोरंजक पद्धतीने विद्यार्थ्यांना समजावून देत आहेत. यासाठी महागडी उपकरणे किंवा स्वतंत्र प्रयोगशाळेची आवश्यकता नसून केवळ ५० ते ६० रुपयांच्या साहित्यातून २०० हून अधिक विज्ञान संकल्पना विद्यार्थ्यांना शिकवता येतात. फुग्यापासून १६ प्रकारचे प्रयोग, संत्र्याची साल, यीस्ट आणि पाण्यापासून बायो-क्लिनर तयार करणे, साध्या नरसाळ्याच्या साहाय्याने स्टेथोस्कोप बनविणे अशा विविध प्रयोगांमधून विद्यार्थी विज्ञानाशी प्रत्यक्ष जोडले जातात. पुस्तकापलीकडे स्वतः प्रयोग करून पाहिल्यामुळे संकल्पना दीर्घकाळ लक्षातही राहतात. वर्गापासून राष्ट्रीय व्यासपीठापर्यंत… ‘लॅब इन हँड’च्या माध्यमातून शिंदे यांनी आतापर्यंत ४० पेक्षा अधिक कार्यशाळा विनामूल्य घेतल्या आहेत. कोरोना काळात तसेच शिक्षण विभागाच्या माध्यमातून राज्य व जिल्हास्तरावर या कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले. शिंदे यांनी पूर्वी जिरेवाडी (बीड) शाळेत कार्यरत असताना त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी राज्य व राष्ट्रीय स्तरावरील विविध विज्ञानविषयक स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवून यश मिळविले. राज्य विज्ञान नाट्य स्पर्धा, विज्ञान प्रदर्शन तसेच चिल्ड्रन सायन्स काँग्रेस यांसारख्या स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. त्यांच्या एका विद्यार्थ्याने तयार केलेल्या ‘बायो-क्लिनर’ प्रयोगाची राष्ट्रीय स्तरावर निवड झाली. तसेच आयसर (IISER), पुणे येथे झालेल्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनातून त्यांच्या विद्यार्थ्यांची राष्ट्रीय स्तरासाठी निवड झाली होती. फेलोशिपपासून राष्ट्रीय पुरस्काराच्या टॉप-२०पर्यंत विज्ञान शिक्षणातील योगदानाची दखल घेत शिंदे यांना मुंबईच्या होमी भाभा बालवैज्ञानिक केंद्राची (HBCSE) फेलोशिप तसेच ‘शरद पवार इन्स्पायर फेलोशिप’ मिळाली आहे. राष्ट्रीय स्तरावरील विज्ञान शिक्षकांच्या एसटीएससी (STSC) पुरस्काराच्या टॉप-२० शिक्षकांमध्येही त्यांच्या कार्याची निवड झाली आहे.
Source link
महागडी लॅब नाही, विद्यार्थ्यांना ‘लॅब इन हँड’ने विज्ञानाची गोडी:ग्रामीण विद्यार्थ्यांची राज्य, राष्ट्रीय भरारी