Headlines

नागपुरात 8 ड्रग्ज तस्करांवर 'मोक्का' अंतर्गत कारवाई:शहर पोलिसांनी अंमली पदार्थ तस्करीचे कंबरडे मोडले




नागपूर शहर पोलिसांनी अंमली पदार्थांच्या तस्करीविरोधात मोठी कारवाई केली आहे. कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका आंतरजिल्हा ड्रग्ज तस्कर टोळीवर ‘मोक्का’ (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत टोळीचा प्रमुख सतीश सुभाष वडे याच्यासह एकूण आठ तस्करांचा समावेश आहे. या टोळीवर अंमली पदार्थांची बेकायदेशीर खरेदी-विक्री, वाहतूक आणि वितरण केल्याचा आरोप आहे. तरुण पिढीला अंमली पदार्थांच्या आहारी ढकलून मोठा आर्थिक नफा कमावत असल्याचे तपासात समोर आले आहे. कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्याच्या तपासादरम्यान या टोळीची गंभीर गुन्हेगारी पार्श्वभूमी उघड झाली. या टोळीवर यापूर्वी खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, बेकायदेशीर हत्यारे बाळगणे आणि प्राणघातक हल्ले करणे अशा तब्बल ४३ गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. याव्यतिरिक्त, अंमली पदार्थ विरोधी कायद्यांतर्गत विविध पोलीस ठाण्यांमध्ये तीन गुन्हे दाखल आहेत. गुन्हेगारी कारवाया थांबत नसल्याने, पोलीस उप आयुक्त राहुल मदने यांच्यामार्फत अप्पर पोलीस आयुक्त (उत्तर प्रभाग) यांच्याकडे मोक्का कारवाईचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता. या प्रस्तावाला १७ जून रोजी मंजुरी मिळाली. या कारवाईत टोळी प्रमुख सतीश सुभाष वडे (वय २८, महाल) याच्यासह प्रतीक चंद्रकांत कदम (वय ३१, कोतवाली), मंथन अशोक खोब्रागडे (वय २८, नंदनवन), प्रज्वल उर्फ शिवम उर्फ गंगा प्रशांत काकडे (वय २७, सक्करदरा), कृषक विनोद शाहू (वय १९, गणेशपेठ), तृण चंद्रमणी तिरपुडे (वय २२, कोतवाली), रवी मनोज महंतो (वय २८, कोतवाली) आणि क्रिश राम बमनेट (वय १९, गणेशपेठ) यांच्यावर मोक्का अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *