Headlines

जिमपासून योगाकडे:अभिनेत्री योगिता चव्हाणने सांगितला तिच्या फिटनेसचा प्रवास, म्हणाली – नियमित योगामुळे माझा थायरॉईड नियंत्रणात राहण्यास मदत होते




आंतरराष्ट्रीय योग दिन दरवर्षी २१ जून रोजी जगभरात साजरा केला जातो. योगाचे मूळ हजारो वर्षांपूर्वीचे मानले जाते. योगाचा सतत सराव आणि अभ्यास केल्यानंतर शरीर या आसनांसाठी अनुकूल होते. मराठी अभिनेत्रीही आपल्या फिटनेससाठी योगाभ्यास करताना दिसून येतात. सन मराठी वरील ‘तू अनोळखी तरी सोबती’ या मालिकेतील अभिनेत्री योगिता चव्हाणने योगाविषयी तिचं मत शेअर केलं आहे. योगिता चव्हाण म्हणाली की,”एक अभिनेत्री म्हणून स्वतःला फिट ठेवणं माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. कलाकारांचं कामाचं वेळापत्रक खूप धावपळीचं आणि अनियमित असतं. सततचं शूटिंग, प्रवास आणि त्यामध्ये स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणं हे एक मोठं आव्हान असतं. पूर्वी मी जिमवर जास्त भर द्यायचे, पण आता मला योगाचं खरं महत्त्व समजलं आहे. माझ्या दिवसाची सुरुवात मलासनमधे बसून गरम पाणी पिणं, प्राणायाम आणि काही सोप्या योगासनांनी होते. यामुळे खूप फ्रेश वाटतं आणि सकारात्मक ऊर्जा मिळते. योग हा फक्त व्यायाम नाही, तर शरीर, मन आणि आत्मा यांना जोडणारा एक सुंदर मार्ग आहे.मला थायरॉईडचा त्रास आहे आणि नियमित योगामुळे त्यावर नियंत्रण ठेवण्यास खूप मदत होत आहे. योगामुळे शरीराची लवचिकता वाढते, ताण कमी होतो आणि आत्मविश्वासही वाढतो.” पुढे ती म्हणाली की, “आजच्या धकाधकीच्या जीवनात आपण स्वतःसाठी वेळ काढणं विसरून जातो, पण दिवसातील काही मिनिटं योगासाठी दिली तर त्याचा फायदा संपूर्ण दिवसभर जाणवतो. आजकाल प्रत्येक आजारासाठी औषधं उपलब्ध आहेत, पण निरोगी राहण्यासाठी चांगल्या सवयी आणि शिस्तबद्ध जीवनशैली तितकीच महत्त्वाची आहे. योग आपल्याला स्वतःशी जोडतो आणि जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पाहायला शिकवतो.माझ्या मते, योग हा कोणत्याही वयाच्या व्यक्तीसाठी उपयुक्त आहे. तुम्ही किती व्यस्त असलात तरी दिवसातून काही मिनिटं योगासाठी द्या. निरोगी शरीर, शांत मन आणि आनंदी आयुष्यासाठी योगासारखा दुसरा मित्र नाही.”



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *