.

वारकरी सांप्रदायाचा इतिहास आणि संत साहित्यातून विश्वव्यापक मानवी जीवनाचे दर्शन होते. जीवनात आपले पणाची व अहंकारी भावनेचे बळ वाढते. अहंकाराला छेद देत संसार जिंकण्याची व संसार व परमार्थ यांची सांगड घालण्याची शिकवण भक्तीतूनच मिळते आणि या मार्गे भगवंताला आपलसं करून भगवंतापर्यंत पोहोचण्यासाठी भक्ती हाच एकमेव मार्ग असल्याचे निरुपण पुण्यातील ज्ञानेश बुवा धानोरकर यांनी केले.
अक्कलकोट | श्री दत्त गुरुचे अवतार श्री स्वामी समर्थ महाराज यांचा १४८ वा पुण्यतिथी महोत्सव वटवृक्ष श्री स्वामी समर्थ महाराज मंदिर येथे चालू आहे. यामध्ये पहाटे ५ वाजता काकड आरतीनंतर सुमधुर सनई चौघड्याचे स्वर कानी पडतात. वटवृक्ष स्वामी समर्थ महाराजांच्या दरबारात पुण्यतिथी महोत्सवात गेल्या ४० वर्षापासून मावडीकरांची दुसरी पिढी सनई चौघडा वादनाची सेवा सादर करीत अक्कलकोट वासियांची स्वामी भक्तांची पहाट अविस्मरणीय करत आहेत. सनईवादक मावडीकर हे १९८७ ला सोलापूर येथे काही कामानिमित्त आले होते. तेव्हा ते तीर्थक्षेत्र अक्कलकोट येथे स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी आले. तेव्हा वटवृक्ष स्वामी समर्थ देवस्थानचे तत्कालीन विश्वस्त चेअरमन स्व. बाळासाहेब इंगळे यांची भेट झाली. १९८७ ला तारद्वारे स्वामीच्या दरबारात सनई चौघडा वादनासाठी आमंत्रित करण्यात आले. सध्या मावडीकर यांची दुसरी पिढी गणेश मावडीकर पुणे हे चौघडा वादनाचे काम करत आहेत.
प्रतिनिधी | अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदीरात आज सोलापूरच्या रसिका-सानिका कुलकर्णी यांच्या सुमधुर गायनात भाविक तल्लीन झाले. श्री स्वामी समर्थांच्या १४८ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान आयोजित धर्मसंकीर्तन महोत्सवात सातव्या पुष्पमालेतील दुसरे सत्र आज सोलापूरचे गायिका रसिका, सानिका कुलकर्णी यांच्या भक्तिमय गायन सेवेने गुंफले. या गायन सेवेत रसिका- सानिका कुलकर्णी यांनी कार्यक्रमाची सुरुवात सूर निरागस गणेश वंदन गीताने केली. यानंतर वृंदावनी वेणू, स्वप्नांत आले, माझ्या गुरुदेव दत्त, उघड नयन देवा, पराधीन आहे जगती, कानडा राजा पंढरीचा इत्यादी गीते सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. यावेळी उपस्थित भक्तांनी उत्साहपूर्ण टाळ्यांच्या गजरात साथ दिली. श्रोत्यांचा हा उत्साह शेवटपर्यंत कायम होता. या गायन सेवेत त्यांना तबल्यावर अक्षय भडंगे, ऑक्टोपॅडवर यश जवळकर, साऊंड सिस्टीमवर प्रकाश कासेगांवकर, यांनी साथसंगत केली. या कार्यक्रमाचे निवेदन अभिषेक परदेशी यांनी केले.