![]()
येथील पाच तरुणांचा गणपतीपुळे येथे समुद्रात बुडून मृत्यू झाला. दुर्घटनेनंतर रविवारी शोकाकुल वातावरणात चार तरुणांवर बिडकीनला तर एकावर मुळगावी सोमपुरी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. तरुणांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी व्यावसायिकांनी दुकाने बंद ठेवली. २० जून रोजी बिडकीन येथून १९ तरुणांचा एक गट देवदर्शनासाठी गणपतीपुळे येथे गेला होता. मात्र, समुद्राच्या पाण्याचा अंदाज न आल्याने यातील पाच तरुण बुडाले. २१ जून रोजी दुपारपर्यंत चौघांचे मृतदेह हाती लागले. त्यांची उत्तरीय तपासणी झाल्यानंतर दुपारी साडेतीन वाजता रुग्णवाहिका चौघांचे मृतदेह घेऊन सोमवारी सकाळी ७ वाजता बिडकीनला पोहोचली. तर पाचव्या तरुणाचा मृतदेह २१ जून रोजी सायंकाळी सव्वापाच वाजता सापडल्यामुळे त्याचे पार्थिव सोमवारी ११ वाजता गावात आणण्यात आले. शेकटा रोडवरील अमरधाम स्मशानभूमीमध्ये सकाळी ९ वाजेच्या सुमारास आनंद राजू नरवडे (२०), यश रामेश्वर कांबळे (१९) आणि प्रेम दीपक आदमाने (१९), आदित्य संतोष राऊत (२२) यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अनिकेत बंडू हिवराळे (२०) याच्यावर त्याच्या मूळ गावी सोमपुरी येथे अंत्यसंस्कार पार पडले. या वेळी माजी खासदार चंद्रकांत खैरे, जिल्हा परिषद सदस्य शिवराज पाटील भुमरे, मनोज पेरे, सरपंच अशोक धर्मे, नंदकुमार वैद्य, विकास गोर्डे, काकासाहेब टेके, डॉ. गणेश शिंदे आदींनी श्रद्धांजली अर्पण केली. व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवली होती.
Source link
कुटूंबियांचा आक्रोश:बिडकीनला एकावेळी चार मित्रांच्या अंत्ययात्रा, एकावर सोमपुरीत अंत्यविधी