Headlines

मिसिंग लिंकवरील दरड बोगद्याबाहेरच कोसळली:राडारोडा हटवून वाहतूक पूर्ववत; 'एमएसआरडीसी'ची माहिती




पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्पाजवळ सोमवारी सकाळी दरड कोसळली. ही घटना पूर्णपणे नैसर्गिक असून, बोगद्याच्या कामाच्या गुणवत्तेशी किंवा तांत्रिक त्रुटीशी तिचा संबंध नसल्याचे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे (एमएसआरडीसी) उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. अनिलकुमार गायकवाड यांनी स्पष्ट केले. लोणावळा परिसरात रविवारी मध्यरात्रीनंतर झालेल्या विक्रमी पावसानंतर सोमवारी सकाळी मिसिंग लिंक बोगद्याजवळ दरड कोसळली. डोंगरावरून मोठा दगड घरंगळत खाली आल्याने द्रुतगती मार्गावर मोठ्या प्रमाणात दगड-मातीचा राडारोडा पसरला. या दगडाच्या धडकेमुळे बोगद्याच्या प्रवेशद्वारावरील गर्डरचेही नुकसान झाले. घटनेनंतर संबंधित यंत्रणांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी राडारोडा हटवण्याचे काम हाती घेतले आणि नुकसान झालेला गर्डरही काढून टाकला. बोगद्याच्या कामाच्या गुणवत्तेबाबत सुरू असलेल्या चर्चा डॉ. गायकवाड यांनी फेटाळून लावल्या. ही घटना नैसर्गिक कारणांमुळेच घडल्याचे त्यांनी पुन्हा स्पष्ट केले. याशिवाय, बोगद्याच्या सुरुवातीच्या भागात मोठ्या प्रमाणावर पाणी झिरपत असून ते वाहत येत असल्याची माहितीही डॉ. गायकवाड यांनी दिली. सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पाण्याचा नेमका स्रोत शोधणे शक्य नाही. पाऊस थांबल्यानंतर तज्ज्ञांच्या मदतीने झिरपणाऱ्या पाण्याचा उगम शोधून त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरड कोसळल्यानंतर सुरक्षेच्या दृष्टीने संबंधित भागातील वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले होते. रस्त्यावर पडलेला राडारोडा हटवणे, नुकसान झालेल्या संरचनेची दुरुस्ती आणि परिसराची सुरक्षितता तपासण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते. सर्व तांत्रिक तपासण्या पूर्ण झाल्यानंतर आणि मार्ग सुरक्षित असल्याची खात्री झाल्यावर मिसिंग लिंक परिसरातील पुणे-मुंबई द्रुतगती मार्गिका वाहतुकीसाठी पूर्ववत सुरू करण्यात आली आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत असल्याचे डॉ. गायकवाड यांनी नमूद केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *