![]()
कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ, सातारा या समूह विद्यापीठाच्या नूतन कुलाधिकारीपदी खासदार सुप्रिया सुळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती महामहीम जिष्णुदेव वर्मा यांनी दि. 12 ऑगस्ट 2026 रोजी जारी केलेल्या आदेशानुसार ही नियुक्ती करण्यात आली. त्यानुसार सुप्रिया सुळे यांनी 22 ऑगस्ट 2026 रोजी विद्यापीठाच्या कुलाधिकारीपदाचा पदभार स्वीकारला. विद्यापीठाचे प्रथम कुलाधिकारी म्हणून रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी यांनी जबाबदारी सांभाळली आहे. त्यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर आता सुप्रिया सुळे यांची नूतन कुलाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठामध्ये 21 विषयातील पीएच.डी अभ्यासक्रम सुरु असून संशोधन क्षेत्रात विद्यापीठाचे उत्तम कामकाज सुरु असल्याची माहिती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ज्ञानदेव म्हस्के यांनी दिली. विद्यापीठाचे कुलगुरू, कुलसचिव, सांविधिक अधिकारी व अधिष्ठाता यांच्या उपस्थितीत विद्यापीठाचे चंद्रकांत दळवी यांनी आपल्या पदाचा कार्यभार नूतन कुलाधिकारी सुप्रिया सुळे यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी त्यांनी विद्यापीठाच्या प्रशासकीय, शैक्षणिक व विविध विभागांच्या कामकाजाची तसेच विद्यापीठामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची सविस्तर माहिती नूतन कुलाधिकारी सुप्रिया सुळे यांना दिली. रयत शिक्षण संस्थेचे व्हाईस चेअरमन ॲड. भगीरथ शिंदे यांनी नूतन कुलाधिकारी खासदार सुप्रिया सुळे यांचे मनःपूर्वक स्वागत करून त्यांचे अभिनंदन केले. पदभार स्वीकारल्यानंतर बोलताना नूतन कुलाधिकारी खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, “कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाच्या कुलाधिकारीपदी नियुक्ती होणे ही माझ्यासाठी अत्यंत सन्मानाची बाब आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून सर्वसामान्य, ग्रामीण आणि वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देण्याचे जे स्वप्न पाहिले, त्या स्वप्नाची पूर्तता करणारे हे विद्यापीठ आहे. त्यामुळे ‘कर्मवीरांच्या स्वप्नातील विद्यापीठ’ अधिक सक्षम, गुणवत्तापूर्ण आणि समाजाभिमुख करण्याची जबाबदारी माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. या विद्यापीठाच्या उभारणीसाठी तसेच भविष्यातील सर्वांगीण प्रगतीसाठी योगदान देताना मला मनस्वी आनंद होईल. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण, आधुनिक ज्ञान, कौशल्याधिष्ठित अभ्यासक्रम आणि संशोधनाच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी सर्वांच्या सहकार्याने काम करण्याचा माझा प्रयत्न राहील.” या प्रसंगी रयत शिक्षण संस्थेच्या उच्च शिक्षण विभागाचे सहसचिव प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे, माध्यमिक शिक्षण विभागाचे सहसचिव बंडू पवार, विद्यापीठाच्या विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता प्रा. डॉ. अनिलकुमार वावरे, प्रा. डॉ. डी. डी. नामदास, प्रा. डॉ. आर. आर. साळुंखे, विद्यापीठाचे कुलसचिव प्रा. डॉ. विजय कुंभार, परीक्षा विभागाचे संचालक डॉ. हेमंत उमाप, वित्त व लेखाधिकारी डॉ. धनाजी जाधव, तसेच घटक महाविद्यालयांचे प्राचार्य डॉ. साळुंखे, प्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे, उपकुलसचिव बिना निपाने, निर्मल पवार, जगन्नाथ काटकर आदी उपस्थित होते.
Source link
सुप्रिया सुळे कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाच्या नव्या कुलाधिकारी!:साताऱ्यातील विद्यापीठाचा पदभार अधिकृतरीत्या स्वीकारला