Headlines

'धमक्यांना घाबरू नका, खंबीरपणे लढत राहा':राहुल गांधींनी दिला कॉंग्रेस नेत्यांना कानमंत्र; 'छात्रों की गुंज' कार्यक्रमपूर्वी घेतली बैठक




काँग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज पुणे दौऱ्यावर असून, ते ‘छात्रों की गुंज’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तरुण वर्गाशी (जेन-झी) थेट संवाद साधणार आहेत. या विशेष कार्यक्रमात तरुणांच्या समस्या आणि त्यांचे प्रश्न जाणून घेण्यावर भर दिला जाणार आहे. पुण्यात आगमन होताच विमानतळावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह पक्षाच्या इतर दिग्गज नेत्यांनी त्यांचे स्वागत केले. यानंतर त्यांनी राज्यातील प्रमुख काँग्रेस नेत्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक घेत सद्यस्थितीचा सविस्तर आढावा घेतला. या बैठकीच्या सुरुवातीलाच राहुल गांधी यांनी पुण्यात काल घडलेल्या विद्यार्थ्यांच्या घटनेची गंभीर दखल घेतली आणि नेत्यांकडून त्याबाबतची संपूर्ण माहिती जाणून घेतली. आगामी काळात सत्ताधाऱ्यांकडून तुम्हाला धमकावण्याचा किंवा घाबरवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो, मात्र कोणत्याही दबावाला बळी न पडता तुम्ही खंबीरपणे लढत राहा, असा कानमंत्र त्यांनी पक्षाच्या नेत्यांना दिला. यासोबतच राज्यातील इतर अनेक महत्त्वाच्या सामाजिक आणि राजकीय प्रश्नांवरही या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. राहुलजी आम्हाला ‘विचार’ देतात- विजय वडेट्टीवार या बैठकीचा वृत्तांत देताना विजय वडेट्टीवार यांनी सांगितले की, राहुल गांधींनी आम्हाला भाजपच्या धमक्यांना न घाबरता आमचा संघर्ष सुरूच ठेवण्याचा विचार दिला आहे. सध्याचे भाजप सरकार हे लोकांच्या मनातून पूर्णपणे उतरले असून ते केवळ एक ‘तांत्रिक’ सरकार उरले आहे, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली. तसेच, राहुलजी आम्हाला कानमंत्र नव्हे तर विचार देतात, कानमंत्र देण्याचे काम भाजपचे लोक करतात आणि आमचा त्या प्रवृत्तीवर विश्वास नाही, असा टोलाही त्यांनी लगावला. कॉंग्रेसमधली मरगळ दूर झाली- विशाल पाटील यावेळी माध्यमांशी बोलताना अपक्ष खासदार तसेच कॉंग्रेस समर्थक विशाल पाटील यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, राहुल गांधी यांच्या स्वागतासाठी आज पुण्यात सगळे आलेले आहेत,⁠ राज्यात जी परिस्थिती आहे त्याचा आढावा घेतला जात आहे. महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेण्याची ही वेळ नाही.⁠ आम्ही एवढे दिवस प्रयत्न करत होतो. मात्र, आता लोकांमध्ये त्या गोष्टी पोहोचायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे, त्याचा आनंद आहे. काँग्रेसमध्ये जी मरगळ म्हणत होती, ती दूर झालेली पाहायला मिळते. राहुल गांधी यांच्या पुण्यातील ‘छात्रों की गुंज’ या कार्यक्रमावरून सध्या सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय जुंपली आहे. एकीकडे काँग्रेस नेत्यांकडून या कार्यक्रमाचा मोठ्या प्रमाणावर प्रचार आणि प्रसार केला जात आहे, तर दुसरीकडे भाजप नेत्यांनी यावरून राहुल गांधींवर जोरदार टीका केली असून, विद्यार्थ्यांचा केवळ राजकीय फायद्यासाठी वापर केला जात असल्याचा आरोप भाजपने केला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *