![]()
जुन्नर तालुक्यातील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार आणि मृत्यूच्या गंभीर प्रकरणानंतर शिवसेना नेत्या तथा विधान परिषद सदस्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज पीडित कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दूरध्वनीवरून कुटुंबाशी संवाद साधत त्यांना न्याय आणि सुरक्षेची ग्वाही दिली. एकनाथ शिंदे यांनी पीडित कुटुंबाला सांगितले की, शासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. त्यांच्या सुरक्षेची पूर्ण काळजी घेतली जाईल आणि या प्रकरणात लवकरात लवकर न्याय मिळण्यासाठी सर्वतोपरी पाठपुरावा केला जाईल. डॉ. गोऱ्हे यांनी पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीप गिल आणि संबंधित अधिकाऱ्यांकडून तपासाची माहिती घेतली. तपास योग्य दिशेने सुरू असल्याचे सांगत त्यांनी वैद्यकीय, फॉरेन्सिक, तांत्रिक आणि अन्य पुरावे भक्कमपणे संकलित करून न्यायालयासमोर मांडण्याची आवश्यकता व्यक्त केली. “नसरापूर प्रकरणात ज्याप्रमाणे सक्षम तपास, भक्कम पुरावे आणि प्रभावी न्यायालयीन पाठपुराव्यामुळे आरोपीला फाशीची शिक्षा झाली, त्याच धर्तीवर जुन्नर प्रकरणातील आरोपीलाही कठोरातील कठोर शिक्षा मिळावी,” असे डॉ. गोऱ्हे म्हणाल्या. यासाठी शासन, पोलिस आणि सरकारी वकील यांच्या स्तरावर सातत्याने पाठपुरावा करण्याची मागणी त्यांनी केली. पीडित कुटुंबाने आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, गावातील अवैध मद्यविक्री व व्यसनाधीनतेवर नियंत्रण आणावे, मुला-मुलींच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष द्यावे आणि कोणत्याही प्रकारची भीती निर्माण होणार नाही असे सुरक्षित वातावरण उपलब्ध करून द्यावे, अशा प्रमुख अपेक्षा व्यक्त केल्या. डॉ. गोऱ्हे यांनी आदिवासी व दुर्गम वस्त्यांतील महिला व बालकांच्या सुरक्षिततेकडेही विशेष लक्ष देण्याची गरज अधोरेखित केली. अशा गंभीर घटना घडल्यानंतर केवळ तपास व कारवाई करून थांबणे पुरेसे नसून, अशा घटना घडूच नयेत यासाठी प्रतिबंधात्मक यंत्रणा अधिक सक्षम करणे आवश्यक असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले. पोलीस, ग्रामपंचायत, शाळा-महाविद्यालये, महिला व बालसुरक्षा यंत्रणा, सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक यांच्या सहभागातून ‘कम्युनिटी पोलिसिंग’ मजबूत करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. ग्रामीण भागातील महिला व बालकांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस प्रशासन आणि स्थानिक समाज यांच्या सहभागातून ‘पिंपळवंडी पॅटर्न ऑफ पोलीस सिक्युरिटी’ विकसित करून प्रभावी प्रतिबंधात्मक मॉडेल म्हणून पुढे नेता येईल, असेही डॉ. गोऱ्हे यांनी सुचवले.
Source link
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा पीडित कुटुंबाला फोन:डॉ. गोऱ्हे यांच्या जुन्नर भेटीत न्याय-सुरक्षेची ग्वाही