![]()
पिंपरी चिंचवड येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत आणि माजी खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते “उद्धव श्री पुरस्कार 2026” चे वितरण करण्यात आले. यावेळी बोलताना खासदार संजय राऊत यांनी विरोधकांवर बोचरी टीका केली. ते म्हणाले की, विरोधकांना निवडणुकीच्या वेळी ‘लाडकी बहीण’ आठवते. खासदार राऊत यांनी कलाकारांना, क्रीडापटूंना आणि सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींना राजाश्रय मिळायला हवा यावर भर दिला. हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी नेहमीच अशा व्यक्तींचा सन्मान केला, तसेच रक्तदान आणि आरोग्य शिबिरांची चळवळ सुरू केली. उद्धव ठाकरे त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून जबाबदारीने काम करत असल्याचेही त्यांनी नमूद केले. कोरोना काळात अवघे जग ठप्प झाले असताना, उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेची स्वतःच्या कुटुंबाप्रमाणे जबाबदारी घेतली होती, याची दखल सर्वोच्च न्यायालयानेही घेतली आहे, असे राऊत म्हणाले. “जिथे संकट तिथे शिवसेना” या पद्धतीने सर्वसामान्यांचे प्रश्न घेऊन शिवसेना काम करत आहे. शिवसेनेने अगोदर काम केले आणि मग मते मागितली, असेही राऊत यांनी स्पष्ट केले. यावेळी माजी खासदार विनायक राऊत यांनी सध्याच्या राजकारणावर भाष्य केले. ते म्हणाले की, सध्या पुढे पुढे करणाऱ्यांचे दिवस आहेत आणि प्रामाणिक माणसांच्या पदरी उपेक्षा येत आहे. मात्र, शिवसेनेच्या माध्यमातून पुरस्कार देऊन अशा प्रामाणिक व्यक्तींचा सन्मान केला जात आहे. महाराष्ट्रातील 36 हजार उद्योग बंद पडले आहेत, ही महाराष्ट्रासाठी लाजिरवाणी बाब आहे. उद्योजकांना दिलासा देण्याऐवजी त्रास दिला जात असून, त्यांच्यावर सर्वाधिक कर लावला जात आहे, अशी टीका त्यांनी केली. या पुरस्कार सोहळ्याचे उत्कृष्ट नियोजन करणाऱ्या चेतन पवार यांच्यावर उद्धव ठाकरे यांचा पूर्ण विश्वास असल्याचेही विनायक राऊत यांनी सांगितले. या सोहळ्यात डॉ. संतोष लाटकर (वैद्यकीय), डॉ. रोहन काटे (वैद्यकीय), प्रा. तुकाराम पाटील (साहित्यिक), काशिनाथ नखाते (कामगार), प्रीती वैद्य (सामाजिक), चांद पाशा अहमद हुसेन तांबोळी (क्रीडा), पै. योगेश्वर तापकीर (क्रीडा), भाग्यश्री मोरे (सामाजिक), रामदास काटे (कृषी), डॉ. संजीव कुमार पाटील (कला), शौर्या भरणे (क्रीडा), रियाज शेख (कुस्ती) आणि भाग्यश्री मोरे (दिव्यांगांसाठी कार्य) यांना “उद्धव श्री पुरस्कार २०२६” देऊन सन्मानित करण्यात आले.
Source link
खासदार संजय राऊत यांच्या हस्ते 'उद्धव श्री पुरस्कार' वितरण:राऊत म्हणाले, विरोधकांना निवडणुकीत 'लाडकी बहीण' आठवली