![]()
रंगमंचावरील धुपाचा वास, तिसरी घंटा ऐकली की कलाकरांची समाधी लागते. धडपडीतून कलावंत बनण्याचा प्रयत्न हा अवर्णनीय असतो. आपल्याला जे म्हणायचे असते, समाजाविषयी जे मांडायचे असते ते तरुण मंडळी कलेच्या माध्यमातून रंगमंचावर मांडत असतात. जेथे व्यक्त होण्याचा प्रयत्न केला जात असतो ती आपली खरी जागा असते, असे प्रतिपादन प्रख्यात सिने-नाट्य अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी केले. आयुष्यात विद्यार्थीपण आहे तोपर्यंतच जगण्याला खरा अर्थ आहे. एकदा ते विद्यार्थीपण संपले की अस्तित्व उरत नाही. असे होऊ नये याची प्रत्येकाने काळजी घ्यावी, असा सल्लाही त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. १३२ वर्षांची अखंडित कारकीर्द असलेल्या भरत नाट्य संशोधन मंदिर या एकमेव मराठी नाट्य संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त दिल्या जाणाऱ्या संस्था पुरस्कारांचे वितरण आणि भरत-रोटरी एकांकिका स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी मकरंद अनासपुरे बोलत होते. पु. ल. देशपांडे अकॅडमीच्या संचालक मीनल जोगळेकर, रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१चे प्रांतपाल नितीन ढमाले, भरत नाट्य मंदिराचे अध्यक्ष पं. पांडुरंग मुखडे, उपाध्यक्ष भाग्यश्री देसाई, कार्याध्यक्ष अभय जबडे, राजेंद्र उत्तुरकर तसेच परिक्षक संजय डोळे, नरेंद्र आमले, रश्मिता शहापूरकर मंचावर होते. भरत नाट्य मंदिरात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भरत नाट्य संशोधन मंदिराच्या प्रदीर्घ वाटचालीचा आणि रोटरी क्लबचा गौरव करून मकरंद अनासपुरे म्हणाले, सामाजिक कार्य करणारी मंडळी निरपेक्ष भावनेने कार्य करीत असतात. आपल्याला नेहमी प्रश्न पडतो की, आभाळाचे झुंबर पडत का नाही त्यामागचे कारण म्हणजे नि:स्वार्थ भावनेने कार्य करीत असलेली मंडळी. त्यामुळे आपला समाज टिकून आहे. भरत नाट्य संशोधन मंदिरात प्रदीर्घ कार्य करणारे विठ्ठल हुलावळे यांच्या कार्याचा अनासपुरे यांनी विशेष गौरव केला. मीनल जोगळेकर म्हणाल्या, राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे जे कलावंत आपल्या कलेच्या माध्यमातून निधी संकलनासाठी सहकार्य करतील त्यांना राज्य शासनाने मुंबईतील रवींद्र नाट्य मंदिर मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी पु. ल. देशपांडे अकादमी सहकार्य करणार आहे. जोगळेकर यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत भरत नाट्य संशोधन मंदिराच्या वतीने तीन नाटकांचा महोत्सव आयोजित करण्याची ग्वाही कार्याध्यक्ष अभय जबडे यांनी यावेळी दिली. नितीन ढमाले यांनी रोटरी क्लबच्या सामाजिक उपक्रमांची माहिती विशद केली. भरत नाट्य संशोधन मंदिरातील पडद्यामागील कलाकारांचे पाल्य चिन्मय अमित धुमाळ, श्रेयांश शंतनू कोतवाल, श्रावणी गजानन माळवदकर यांना शिष्यवृत्ती तर सेवाभावी संस्था सहजीवन वृद्धाश्रम आणि डेक्कन इन्स्टिट्यूट ऑफ कॉमर्स यांना आर्थिक मदत देण्यात आली. अनुक्रमे डॉ. दिलीप देवधर आणि धनंजय बर्वे यांनी ही मदत स्वीकारली.
Source link
'विद्यार्थीपण असेपर्यंतच जगण्याला खरा अर्थ':भरत नाट्य संशोधन मंदिर संस्थेच्या पुरस्कार वितरण समारंभात अभिनेत्याचे प्रतिपादन