Headlines

संभाजीनगरमधले 3 मृत्यू:वडिलांसोबतच्या 'त्या' वादातून कुणालची आत्महत्या पोलिसांच्या तपासातून वेगळीच माहिती समोर




कुणाल चांदगुडे (19) या तरुणाने काल (दिनांक 21) छत्रपती संभाजीनगरमधील खवड्या डोंगरावरून उडी मारून आत्महत्या केली. त्याला वाचवताना त्याचे वडील मुरलीधर चांदगुडे (48) यांचाही मृत्यू झाला. तर डोळ्यांसमोर मुलगा आणि पती कोसळल्याचे पाहून आई संगीता चांदगुडे यांनीही डोंगावरून उडी घेतली. या घटनेत त्यांचाही मृत्यू झाला. कुणालने हे टोकाचे पाऊल आयफोनमुळे उचलले असल्याची चर्चा सुरू असतानाच आता पोलिस तपासात मात्र वेगळीच माहिती समोर आली आहे. कुणालच्या आत्महत्येचे आयफोन हे कारण असल्याचे प्राथमिक तपासात दिसत नाही, असे डीसीपी रत्नाकर नवले यांनी स्पष्ट केले आहे. व्हायरल व्हिडिओतील प्रत्यक्षदर्शी माजी सरपंच संजय जाधव यांनीही तेच सांगितले. मुलाला आयफोन हवा होता, अशी चर्चाच झाली नव्हती. उलट, त्याच्याकडे आधीपासूनच आयफोन होता. मात्र, या मुलाने नेमक्या कोणत्या कारणातून आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले, हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे. पोलिसांचे स्पष्टीकरण आयफोन हवा होता म्हणून कुणालने आयुष्य संपवले, अशी घटनेनंतर सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली होती. मात्र, पोलिसांच्या प्राथमिक तपासात या चर्चेला दुजोरा मिळालेला नाही. आयफोन हे कुणालच्या आत्महत्येमागचे कारण असल्याचे प्राथमिक तपासात दिसून येत नाही, असे डीसीपी रत्नाकर नवले यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे आयफोनच्या मागणीमुळेच कुणालने टोकाचे पाऊल उचलल्याची चर्चा सध्या तरी तथ्यहीन असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. प्रत्यक्षदर्शी काय सांगतात? माजी सरपंच संजय जाधव यांनी माध्यमांना सांगितले की, घटनास्थळी ते कुणालची समजूत काढण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी त्यांनी, “तुझ्याकडे आयफोन आहे, आई-वडील तुझे किती लाड करतात,” अशा शब्दांत कुणालला समजावून सांगितल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, कुणालला आयफोन हवा होता आणि त्यासाठीच त्याने टोकाचे पाऊल उचलले, अशी कोणतीही चर्चा घटनास्थळी झाली नव्हती, असे संजय जाधव यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आयफोन हे आत्महत्येचे कारण असल्याची चर्चा प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार घटनास्थळी झाली नव्हती. आत्महत्येचे खरे कारण काय? पोलिसांच्या प्राथमिक तपासातून वडिलांसोबत झालेला वाद हे एक महत्त्वाचे कारण समोर येत आहे. मात्र, हा वाद नेमका कशावरून झाला? त्या क्षणी वडील आणि मुलामध्ये नेमके काय बोलणे झाले? कोणत्या शब्दांनी परिस्थिती इतकी टोकाला गेली? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, कुणाच्या मनात नेमके काय सुरू होते? या प्रश्नांची उत्तरे आता तपासातून मिळतील का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. कारण या घटनेतील तीनही व्यक्ती आता या जगात नाहीत. घटनेच्या काही वेळ आधीपर्यंत ज्या घरात संवाद होता, राग होता, मतभेद होते, त्याच घरात आता केवळ शांतता उरली आहे. वडील नाहीत, आई नाही आणि ज्या मुलाभोवती या सगळ्या घटनेची कहाणी फिरतेय, तो मुलगाही नाही. त्यामुळे त्या कुटुंबाच्या आयुष्यात नेमके काय घडले, कोणत्या क्षणी परिस्थिती हाताबाहेर गेली आणि एका निर्णयाने संपूर्ण कुटुंबाचा अंत कसा झाला, याचे उत्तर कदाचित कायमच अनुत्तरित राहणार आहे का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. अगोदरही आत्महत्येचा प्रयत्न पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कुणालने याच डोंगरावर याआधीही आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यावेळी एमआयडीसी वाळूज आणि चिकलठाणा पोलिसांनी त्याची समजूत काढून त्याला सुरक्षितपणे डोंगरावरून खाली आणले होते. मात्र, वर्षभरानंतर कुणालने पुन्हा हाच डोंगर गाठला. यावेळी आई-वडिलांनी अनेक विनवण्या करूनही तो ऐकण्यास तयार नव्हता. आई, पोलिस आणि घटनास्थळी उपस्थित नागरिकांनीही त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. कुणाल डोंगरावर असताना अग्निशमन दलाने जाळी लावून त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, कुणाल वारंवार जागा बदलत होता. मुलाला वाचवण्यासाठी आईनेही शर्थीचे प्रयत्न केले. “मी वडिलांना सोडते, आपण दोघे वेगळे राहू, त्यांच्यासोबत राहणार नाही,” असे सांगत आईनेही त्याला समजावण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले. मात्र, कुणाल कोणाचेही ऐकण्यास तयार नव्हता. अखेर त्याने टोकाचे पाऊल उचलले. कुणालला वाचवण्यासाठी आई-वडिलांनी शेवटपर्यंत शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात दुर्दैवाने आई आणि वडिलांचाही मृत्यू झाला. त्यामुळे एका मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात संपूर्ण कुटुंबावरच काळाचा घाला घातला गेला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *