![]()
राहुल गांधी यांच्या विद्यार्थी संवाद म्हणजे केवळ नौटंकी आहे. काँग्रेस पक्षाचा आलेख सातत्याने घसरत आहे. संपत चाललेल्या काँग्रेसला पुन्हा उभे करण्यासाठी विद्यार्थ्यांना पुढे करून राजकीय आधार मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. राजकीय उद्देश साध्य करण्यासाठी युवकांचा वापर करून राहुल गांधी देशभरात अशा प्रकारची नौटंकी करीत असल्याचा आरोप महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी नागपुरात प्रसार माध्यमांशी संवाद साधला. युवकांना राजकारणासाठी भडकवू नये पुण्यातील घटनेवर प्रतिक्रिया देताना बावनकुळे यांनी काँग्रेसवर गंभीर आरोप केले. युवकांना पुढे करून संघर्षाची परिस्थिती निर्माण करायची, त्यातून सहानुभूती मिळवायची आणि युवकांची मते आपल्याकडे वळवायची, असा काँग्रेसचा प्रयत्न असल्याचा आरोप त्यांनी केला. पक्षीय राजकारणासाठी युवकांची माथी भडकवण्याचे काम करू नये, अशी आमची भूमिका आहे, असे ते म्हणाले. मुख्यमंत्री फडणवीस युवकांचे ‘यूथ आयकॉन’ नागपुरात होणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘झेन-झी संवाद’ कार्यक्रमाबाबत बावनकुळे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस हे नेहमीच युवकांचे ‘यूथ आयकॉन’ राहिले आहेत. महाराष्ट्रातील युवकांचा त्यांच्यावर विश्वास असून त्यांच्या भूमिकेशी युवक सहमत आहेत. नागपुरात होणाऱ्या या कार्यक्रमाच्या धर्तीवर मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रभर अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जातील. हा कार्यक्रम मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पसंतीचा असल्याचेही त्यांनी सांगितले. युवकांना विज्ञान-तंत्रज्ञानाकडे नेण्याची गरज विजय वडेट्टीवार यांच्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना बावनकुळे यांनी काँग्रेसच्या कार्यक्रमावर टीका केली. काँग्रेस पक्ष राहुल गांधी यांच्या माध्यमातून पक्ष वाचवण्यासाठी हा कार्यक्रम घेत असल्याचे त्यांनी म्हटले. युवकांना माथी भडकावून राजकारण करण्याऐवजी त्यांना विज्ञान, तंत्रज्ञान आणि प्रगतीच्या दिशेने घेऊन जाण्याची गरज आहे. राजकारणासाठी युवकांचा वापर होऊ नये, ही आमची भूमिका आहे, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले. पोषण आहारात गैरप्रकार आढळल्यास FDA कारवाई करेल विद्यार्थ्यांना चुकीचा अथवा निकृष्ट पोषण आहार पुरवला जात असल्याचे आढळल्यास अन्न व औषध प्रशासनाकडून (FDA) नियमानुसार कारवाई केली जाईल. या कारवाईमध्ये महसूल विभागाचा कोणताही हस्तक्षेप राहणार नाही, असेही बावनकुळे यांनी स्पष्ट केले. नवनीत राणा यांच्या भूमिकेबाबत संभ्रम नको नवनीत राणा यांच्या कथित नाराजीबाबत विचारले असता बावनकुळे म्हणाले की, कालचा कार्यक्रम राष्ट्रीय स्तरावरील होता आणि आपण त्या कार्यक्रमाला एकटेच उपस्थित होतो. त्यामुळे कालच्या दौऱ्याचा अन्य कोणताही राजकीय संदर्भ काढण्याची गरज नाही. राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यसभा निवडणुकीसाठी त्यांना ऑफर होती. मात्र, त्यांनी हिंदुत्ववादी भूमिका स्वीकारून युवा खासदार म्हणून काम केले आहे. त्यांचे संपूर्ण राजकीय जीवन भाजपसाठीच असेल. त्यामुळे त्यांच्या भूमिकेबाबत कोणताही संभ्रम निर्माण करण्याची गरज नाही, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले. पारशिवनीतील सुपीक जमीन घेण्यास शेतकऱ्यांचा विरोध असल्यास मार्ग काढू पारशिवनी येथील जमीन प्रकरणावर बोलताना बावनकुळे म्हणाले की, शेतकऱ्यांची सुपीक जमीन घेऊ नये, अशी त्यांची भूमिका आहे. तीन-चार शेतकरी आपल्याला भेटले आहेत. शेतकऱ्यांचा काही गैरसमज अथवा समज असेल तर त्यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा केली जाईल. सुपीक जमीन जाणार असेल आणि शेतकऱ्यांचा तीव्र विरोध असेल तर त्यातून योग्य मार्ग काढला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. शेतकऱ्यांना माती, रेतीवरील रॉयल्टीतून दिलासा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी महसूल विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शेतातील पडीत किंवा असमतल जमीन सपाट करण्यासाठी मोठ्या प्रमाणात माती व इतर साहित्याची गरज भासते. शेतीच्या कामासाठी लागणारी माती व रेती घेण्यासाठी आता रॉयल्टी आकारली जाणार नाही, असे बावनकुळे यांनी सांगितले. याबाबत तहसीलदार, तलाठी आणि पोलिसांना आदेश देण्यात आले आहेत. शेतीच्या कामासाठी आवश्यक साहित्य वापरताना शेतकऱ्यांना अनावश्यक त्रास होऊ नये आणि त्यांना आर्थिक दिलासा मिळावा, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पुढील सहा महिन्यांत सर्व नागरी सुविधांची कामे पूर्ण करण्याचे निर्देश नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील पूरग्रस्त 13 गावांच्या पुनर्वसित वसाहतींमध्ये तब्बल 30 वर्षांनंतर नागरी सुविधा उपलब्ध होणार आहेत. या कामांसाठी निधी मंजूर केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानत, पुढील सहा महिन्यांत सर्व नागरी सुविधांची कामे पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात येतील, अशी माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. या 13 गावांतील नागरिकांचे पूरानंतर स्थलांतर करण्यात आले होते. मात्र, पुनर्वसनानंतरही अनेक वर्षे मूलभूत नागरी सुविधांचा अभाव होता. काटोलचे आमदार चरणसिंह ठाकूर यांनी गावांच्या प्रश्नासाठी सातत्याने बैठका घेऊन पाठपुरावा केला आणि आपल्याकडे मागणी केली होती. त्यानंतर या प्रश्नाला गती मिळाली, असे बावनकुळे यांनी सांगितले. पालकमंत्री म्हणून या गावांना 30 वर्षांनंतर नागरी सुविधा मिळत असल्याचा आनंद असल्याचेही त्यांनी नमूद केले.
Source link
राहुल गांधींचा विद्यार्थी संवाद म्हणजे नौटंकी:युवकांना राजकारणासाठी भडकवू नये, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची टीका