![]()
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या संभाव्य विस्ताराच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. केंद्रात लवकरच मोठे फेरबदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, महाराष्ट्रातील काही खासदारांना मोदी सरकारमध्ये स्थान मिळू शकते, अशी चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर महायुतीतील वरिष्ठ नेत्यांच्या दिल्लीतील भेटीगाठींनाही महत्त्व आले आहे. शिवसेना शिंदे गटालाही या विस्तारात केंद्रातील मंत्रिपद मिळण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. शिंदे गटातून ठाकरेंच्या गटाविरोधात बंड करून आलेल्या सहा खासदारांपैकी कोणाला केंद्रात संधी मिळणार, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. या चर्चेला आता परभणीचे खासदार बंडू जाधव यांच्या एका विधानामुळे आणखी रंग चढला आहे. बंडू जाधव यांनी परभणीत पत्रकार परिषद घेत केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत भाष्य केले. मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात आपल्याला अधिकृत माहिती नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अंतिम निर्णय भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते घेतील, असेही त्यांनी सांगितले. मात्र, आपल्या पक्षाने मंत्रिपदासाठी आपले नाव पुढे केले, तर आपल्याला केंद्रात काम करण्याची संधी मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. इतकेच नव्हे तर आपल्याला मंत्रिपद मिळण्याची शक्यता 100 टक्के असल्याचे वाटते, असे धक्कादायक विधान त्यांनी केले. बंडू जाधव यांच्या या विधानामुळे शिंदे गटातील संभाव्य केंद्रीय मंत्र्यांच्या नावांची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. ठाकरेंच्या गटातून बाहेर पडून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत सहभागी झालेल्या सहा खासदारांमध्ये बंडू जाधव यांचा समावेश आहे. त्यामुळे आगामी मंत्रिमंडळ विस्तारात बंडखोर खासदारांपैकी एखाद्याला केंद्रात स्थान दिले जाणार का, याकडे विशेष लक्ष आहे. जाधव यांच्या वक्तव्यामुळे मात्र त्यांचे नाव संभाव्य मंत्रिपदाच्या चर्चेत आघाडीवर आल्याचे चित्र निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, केवळ स्वतःच्या नावाबाबतच बंडू जाधव यांनी दावा केलेला नाही. त्यांच्या सोबत असलेल्या इतर खासदारांनाही मंत्रिपद मिळू शकते, असे त्यांना वाटत असल्याचे त्यांनी सांगितले. धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर किंवा शिंदे गटातील अन्य खासदार यांच्याबाबतही अशीच शक्यता असल्याचे त्यांनी नमूद केले. एखाद्या खासदाराला आपल्याला मंत्रिपद मिळेल असे वाटणे स्वाभाविक आहे; मात्र अखेर कोणाचे नाव निश्चित करायचे, हा निर्णय पक्षाचे वरिष्ठ नेतेच घेतात, असे स्पष्टीकरणही जाधव यांनी दिले. मंत्रिपदासाठी कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब दरम्यान, संभाव्य केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गटाला एक कॅबिनेट दर्जाचे मंत्रिपद आणि एक राज्यमंत्रिपद मिळण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे. मात्र, या दोन्ही पदांसाठी नेमकी कोणती नावे पुढे केली जाणार, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. अशा परिस्थितीत बंडू जाधव यांनी स्वतःलाच मंत्रिपद मिळण्याची 100 टक्के शक्यता असल्याचे सांगितल्याने राजकीय चर्चेला चांगलेच उधाण आले आहे. आता भाजपचे वरिष्ठ नेते आणि शिवसेना शिंदे गटाचे नेतृत्व मंत्रिपदासाठी कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Source link
मला 100 टक्के मंत्रिपद मिळणार!:मोदींच्या मंत्रिमंडळ विस्ताराआधी एकनाथ शिंदेंच्या खासदाराचा मोठा दावा; मंत्रिपदावर थेट भाष्य