![]()
आढळा खोऱ्यातील डोंगरगाव येथे शनिवारी सायंकाळच्या सुमारास काळीज हेलावून टाकणारी एक थरारक घटना घडली. घराबाहेर अंगणात आईच्या पाठीवर बसलेल्या ४ वर्षांच्या अवणीवर दबा धरून बसलेल्या बिबट्याने भक्ष्य समजून झडप घातली. बिबट्या अवणीला जबड्यात पकडून ओढत नेत असताना, तिच्या वडिलांनी जीवाची पर्वा न करता बिबट्याशी थेट दोन हात केले. बापाच्या या अद्भूत धाडसापुढे बिबट्याला माघार घ्यावी लागली, पण नियतीचा खेळ इथेच संपला नाही. बिबट्याच्या तावडीतून सुटलेले बाप-लेक थेट विहिरीत कोसळले. नशीब बलवत्तर म्हणून ग्रामस्थांच्या मदतीने या दोघांनाही विहिरीतून सुखरूप बाहेर काढण्यात आले असून चिमुकलीला नवे जीवनदान मिळाले आहे. डोंगरगाव येथील अवणी मनोज गुंजाळ (वय ४ वर्षे) ही चिमुकली आईच्या पाठीवर खेळत होती. अचानक दाट अंधारातून आलेल्या बिबट्याने तिच्यावर हल्ला केला आणि तिला जबड्यात धरून ओढू लागला. अवणीच्या किंकाळीने आईने मागे पाहिले तर पोटची लेक बिबट्याच्या तोंडात दिसली! घाबरलेल्या आईने जीवाच्या आकांताने हंबरडा फोडला. पत्नीचा आरडाओरडा ऐकून मनोज गुंजाळ (वय ३२) यांनी तातडीने बाहेर धाव घेतली. समोरचा भयानक प्रकार पाहून त्यांनी एका क्षणाचाही विचार न करता बिबट्याचा पाठलाग केला. मनोज यांनी बिबट्याशी थेट दोन हात करत झुंज दिली. एका बापाच्या या रुद्रावतारापुढे बिबट्या घाबरला आणि चिमुकलीला सोडून त्याने जंगलात धूम ठोकली. या थरारानंतर जखमीअवणीला कडेवर घेऊन मनोज घराकडे पळत सुटले. मात्र, दाट अंधारामुळे वाटेतील विहिरीचा अंदाज आला नाही आणि बाप-लेक दोघेही थेट विहिरीत कोसळले! विहिरीत पडल्यावरही मनोज यांनी लेकीला हातातून सोडू दिले नाही. विहिरीतून त्यांनी मदतीसाठी दिलेल्या आवाजानंतर ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन दोघांनाही बाहेर काढले. सध्या बाप-लेकीवर संगमनेर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून दोघांचीही प्रकृती स्थिर आहे. या घटनेमुळे डोंगरगाव परिसरात वनविभागाविरोधात तीव्र संताप व्यक्त होत असून, आदमखोर बिबट्याला जेरबंद करण्यासाठी तातडीने पिंजरा लावण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
Source link
बापाने बिबट्याच्या जबड्यातून 4 वर्षीय लेकीला खेचून काढले:डोंगरगाव येथील काळजाचा ठोका चुकवणारी घटना