![]()
गोरेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात क्षुल्लक कारणावरून महिलेचा विनयभंग करत कुटुंबीयांना मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी परस्परविरोधी तक्रारींवरून सोमवारी (24 ऑगस्ट) पहाटे गोरेगाव पोलिस ठाण्यात 11 जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (23 ऑगस्ट) रात्री किरकोळ कारणावरून दोन गटांत वाद निर्माण झाला होता. जुना वाद आणि ऐनवेळच्या कारणावरून सुरू झालेली शाब्दिक चकमक थेट हाणामारीपर्यंत पोहोचली. या वादात दोन्ही बाजूंकडून जोरदार मारहाण झाली. पहिल्या गटाची तक्रार या प्रकरणी एका महिलेने गोरेगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. आरोपींनी त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना मारहाण करून त्यांचा विनयभंग केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी शिवाजी वाघ, तान्हाजी वाघ, गजानन वाघ, विष्णू वाघ, सुधाकर वाघ, भास्कर वाघ आणि प्रताप वाघ यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दुसऱ्या गटाची तक्रार दरम्यान, याच घटनेत दुसऱ्या गटातील महिलेनेही पोलिसांत तक्रार दिली. “तुम्ही यापूर्वीही धुऱ्याच्या वादातून आमच्याशी भांडण केले होते; पुन्हा आमच्यामध्ये पडल्यास तुम्हाला खतम करून टाकीन,” अशी जीवे मारण्याची धमकी आरोपींनी दिली, तसेच विनयभंग केल्याचे तक्रारीत नमूद आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी भागवत वाघ, नायबराव वाघ, अभिजीत काकडे यांच्यासह एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. घटनेची माहिती मिळताच सहायक पोलिस निरीक्षक हनुमंत भिंगारे, पोलिस उपनिरीक्षक राठोड आणि जमादार अनिल भारती यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिस उपनिरीक्षक राठोड या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
Source link
हिंगोलीत किरकोळ वादातून 2 गटांत तुफान हाणामारी:महिलेला धमकी देत मारहाण, परस्परविरोधी तक्रारी दाखल